Thursday, May 22, 2025
Homeसंपादकीयसंपादकीय : २२ मे २०२५ - शुगर बोर्डचा स्वागतार्ह पुढाकार

संपादकीय : २२ मे २०२५ – शुगर बोर्डचा स्वागतार्ह पुढाकार

लहान मुलांमध्ये वाढता मधुमेह हा सामाजिक चिंतेचा विषय आहे. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सीबीएसईने त्यांच्याशी संलग्न शाळांमध्ये ‘शुगर बोर्ड’ स्थापन करण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला. एक व्यक्तीने रोज किती साखर खावी? अधिक साखर खाल्ल्याने कोणते दुष्परिणाम होतात? आरोग्यपूरक आहार कसा असतो? अशा अनेक गोष्टींची माहिती मुले आणि त्यांच्या पालकांना देणे ही बोर्ड स्थापनेची काही प्रमुख उद्दिष्ट्ये सांगितली गेली आहेत.

- Advertisement -

मधुमेह ही दीर्घ व्याधी असून सर्वांगीण आरोग्यात विलक्षण गुंतागुंत निर्माण करते. शरीरात मर्यादेबाहेर वाढलेली साखर शरीरांतर्गत विविध अवयवांसाठी घातक ठरते. लहान वयाच्या मुलांना देखील मधुमेह जडत असल्याकडे वैद्यकीय तज्ज्ञ सातत्याने लक्ष वेधून घेतात. मुलांचा अयोग्य आहार, मुलांमध्ये शारीरिक कसरतींचा आणि पालकांमध्ये जागरूकतेचा अभाव ही त्याची काही प्रमुख कारणे संगितली जातात. एवढेच नव्हे तर गर्भार महिलेच्या आहार-विहारात देखील त्याचे मूळ दडलेले असते याकडे संशोधक लक्ष वेधतात.

मूल पोटात असतांना त्या महिलेने साखर आणि साखरयुक्त आहारावर नियंत्रण ठेवल्यास तिच्या बाळाला मधुमेह होण्याचा धोका कमी होतो असा निष्कर्ष कॅलिफोर्निया आणि मॉन्ट्रियल विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी नोंदवल्याचे माध्यमात प्रसिद्ध झालेल्या वृतांत म्हंटले आहे. लहान मुलांच्या आहारात साखरयुक्त आणि अतिरिक्त मिठाचे प्रमाण असलेल्या बाजारात तयार मिळणार्‍या पदार्थांचा मोठ्या प्रमाणात समावेश आढळतो. मुले त्रास देतात या नावाखाली त्यांच्या हातात मोबाइलसारखी साधने सोपवली जातात. परिणामी मुले बैठ्या जीवनशैलीशी बांधली जातात. त्याचे मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम हा वेगळ्या चर्चेचा विषय आहे.

उपाशी राहण्यापेक्षा काहीतरी खातो ना, असे म्हणून त्यांच्या अयोग्य खाण्याकडे पालक दुर्लक्ष करतात. किंबहुना मुलांनी सेवन करावे म्हणूनच गोड पदार्थ त्यांच्या पुढ्यात ठेवले जातात. उदाहरणार्थ दुधात साखर घातली जाते. व्यायामाच्या अभावाने मुलांमध्ये स्थूलता वाढते. अशी शारीरिक स्थिती मधुमेहाला आमंत्रणच ठरते. वैद्यकीय क्षेत्रानुसार मधुमेह कधीही बरा होत नाही. लहान मुलांना मधुमेह जडू नये यासाठी त्यांच्या पालकांना कंबर कसावी लागेल. कारण मुलांना आहार आणि विहाराच्या योग्य अथवा अयोग्य सवयी जडण्यास पालकांचा उपरोक्त दृष्टिकोन कारणीभूत ठरतो.

आरोग्यपूर्ण दिनचर्या आणि योग्य आहाराच्या सवयी लहान वयातच रुजवाव्या लागतात याचे भान पालकांनी ठेवणे आवश्यक आहे. सध्याची पिढी चिकित्सक आहे. वाढत्या वयानुसार त्या दिनचर्येमागचे शास्त्र मुलांना समजावून सांगणे ही पालकांचीच जबाबदारी आहे. शुगर बोर्ड देखील प्रबोधन करेल असे सांगितले गेले आहे. शाळांमध्ये शिक्षक किंवा अन्य सदस्य जे सांगतात ते ऐकले पाहिजे अशी बहुसंख्य पालकांची धारणा असते. मुलांनाही तसेच सुचवले जाते. तेव्हा मधुमेहाबाबतची माहिती विद्यार्थ्यांच्या पालकांना जागरूक करणारी ठरू शकेल.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँक भरतीप्रकरणी नोटिसा बजावण्याचे आदेश

0
कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेतील भरतीत घोटाळा झाल्याचा आरोप करणार्‍या याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दखल घेतली असून बँकेचे अध्यक्ष व भाजपाचे...