Tuesday, October 22, 2024
Homeअग्रलेखसंपादकीय : २२ ऑक्टोबर २०२४ - सहिष्णुता महत्वाची!

संपादकीय : २२ ऑक्टोबर २०२४ – सहिष्णुता महत्वाची!

भेदाभेदाच्या राजकारणामुळे समाज विघटनाच्या उंबरठ्यावर उभा राहिल्याचा धोका सातत्याने वर्तवला जातो. त्याच आशयाच्या भावना अभिनेते ऋषिकेश जोशी यांनी व्यक्त केल्या. अस्मिता टोकदार झाल्याचा अनुभव येतो. त्यामुळे विनोदी लेखनावर मर्यादा आल्या आहेत, असे ते म्हणाले. विनोदीच नव्हे तर सर्वप्रकारच्या लेखनावर आणि भावना प्रगटीकरणावर मर्यादा आल्याचे मत साहित्यिक क्षेत्रात व्यक्त होते.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याची खंत जाणते विविध मार्गांनी व्यक्त करतात. विशेषतः समाज मध्यमांचा वापर यात मोठ्या प्रमाणात केला जातो. लोकांची मती गुंग व्हावी इतका मजकुराचा पाऊस तिथे पडतो. अस्मितांचे राजकारण जोरात सुरू आहे. कळत-नकळत अनेक ठिकाणी भेदाभेद चिकटवले जाताना दिसतात, पण या प्रकारच्या राजकारणाच्या समाज मनावर होणार्‍या परिणामांकडे अस्मितांचे राजकारण करणारे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असतील का? यामुळे माणसांची मने खराब होतात.

- Advertisement -

तरुणांची माथी भडकतात. भावनांचा अतिरेक झाला तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा धोका वाढतो. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होते. अशा वातावरणाची किंमत समाजच मोजतो, याचीच जाणीव सर्वांना होण्याची गरज आहे. अस्मिता टोकदार बनवल्या जात असाव्यात का? वैयक्तिक आणि राजकीय स्वार्थ साधण्यासाठी असे घडत असेल का? अस्मितेच्या आगीवर पोळी भाजून घेण्याचा अस्थानी उद्योग समाजाच्या अनुभवास येतो. तथापि असे घडू न देणे लोकांच्याच हाती आहे, हेही लक्षात घेतले पाहिजे.

‘वसुधैव कुटुंबकम’ ही संस्कृती लोकच पुढे नेऊ शकतात. त्यांनी ठरवले तर ते कोणत्याही प्रकारच्या स्वार्थाला लांब ठेऊ शकतील. सुजाण माणसे विचारशील असतात. ते समाजाच्या वाटचालीला दिशा देऊ शकतात. समाजाची सहिष्णुता कायम ठेऊ शकतात. टोकदार अस्मितांच्या दुष्परिणामांची जाणीव लोकांना, विशेषत: तरुणाईला करून देऊ शकतात. युवांच्या अंगभूत ऊर्जेचा वापर समाज स्वास्थ्यासाठी व्हावा, असे प्रयत्न करू शकतात. जाणत्यांनी ती जबाबदारी स्वीकारून पार पाडायला हवी.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या