मुलांचे ‘सोळावे वरीस धोक्याचे’ मानले जात असले तरी याच अडनिड्या वयाचे काही खेळाडू आयपीएल क्रिकेट साखळी सामन्यांमध्ये खेळत आहेत. त्यातील एक-दोघांना मैदान गाजवायची संधी मिळाली आणि त्यांनी त्या संधीचे सोने करायचा प्रयत्न देखील केला. वैभव सूर्यवंशी हा त्यापैकी एक. तो अवघा चौदा वर्षांचा आहे. त्याने सलामीला येऊन फलंदाजी केली. 34 धावा काढल्या. पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. त्याचा तो पहिलाच व्यावसायिक सामना होता. सलामीच्या फलंदाजावर मोठीच जबाबदारी असते.
संघाला चांगली सुरुवात करून देऊन मजबूत धावसंख्या उभारून देण्याचा पाया रचणे अपेक्षित असते. वैभवने ती जबाबदारी पार पाडली. सतरा वर्षांच्या आयुष म्हात्रेने 32 धावा काढल्या आणि एक झेलही टिपला. या मुलांचे वय देखील वेडेच मानले जाईल. तरीही त्याच वयात ते त्यांच्यासारख्या इतर मुलांपेक्षा वेगळे ठरले. मुलांचा पौगंडावस्थेचा काळ त्यांच्यासाठी आणि त्यांच्या पालकांसाठीही आव्हानात्मक मानला जातो. त्या वयात होणारे शारीरिक आणि मानसिक बदल जसे मुलांना प्रचंड गोंधळवून टाकणारे असतात तसेच पालकांचीही मनस्थिती फारशी वेगळी नसते.
कालपर्यंत पालकांच्या शब्दाबाहेर न जाणारा मुलगा अचानक ऐकेनासा होतो अशी बहुसंख्य पालकांची तक्रार असते. मुले अचानक बंडखोर झालीत यावर पालकांचे एकमत आढळते. मोठ्या माणसांनी त्यांना समान वागणूक द्यावी अशी मुलांची अपेक्षा असते. मुलांना समजावून घेऊन जे पालक परिस्थितीत ताळमेळ साधण्यात यशस्वी होतात त्यांची मुले तशीच मोठी होतात. अडनिड्या वयाच्या मुलांना अचानक मोठे झाल्यासारखे वाटू लागते. याच वयात स्वप्ने पडायला लागतात. सुजाण पालक त्या स्वप्नांना खतपाणी घालतात. त्यांचे ध्येय शोधण्यासाठी मुलांना मदत करतात. आयुष म्हात्रे हे त्याचे चपखल उदाहरण ठरावे. तो सहा वर्षांचा असल्यापासून क्रिकेटचे प्रशिक्षण घेतो. त्याला क्रिकेटमध्ये रस असल्याचे त्याच्या पालकांच्या लक्षात आले.
लहान आहे म्हणून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले नाही. त्याच वयापासून प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. भावभावना हाताळायचे, यश-अपयश पचवायचे, प्रयत्नांवरचा विश्वास कायम राखण्याचे योग्य शिक्षण या वयापासूनच मुलांना पालकांनी द्यायला हवे. मुलांमधील बदल आणि पालकांचा अपेक्षा ही टोके संवादाचा पूल सांधू शकेल. अर्थात त्यासाठी पालकांनाच पुढाकार घ्यावा लागेल. मुलांपेक्षा चार पावसाळे जास्त पाहिले असे पालक म्हणत असतात. पालकांच्या कृतीतून मुलांच्या अनुभवास ते यायला हवे. संधी सगळ्यांना सारखी मिळत नाही.. मिळणार नाही हे खरे सुजाण पालकांचा संवाद आणि विश्वास याच्या बळावर मुले त्यांच्या वाटा शोधण्याची क्षमता नक्की कमवतात. पालकांनी योग्य वयात रुजवलेली मूल्ये समतोल साधण्याचे मुलांना आयुष्यभर बळ देतात.