थोड्याशा पावसानेदेखील शहरे पाण्यात बुडण्याला निःसंशय प्रशासनाची अकार्यक्षमता आणि तत्कालीन सत्ताधार्यांची जनतेला गृहीत धरण्याची वृत्ती जबाबदार आहे याविषयी दुमत नसावे. तथापि नद्या आणि नाले कोणामुळे तुंबतात हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. कारण शहरे पाण्यात जाण्याचे तेही एक महत्त्वाचे कारण आहे, असा निष्कर्ष आयआयटी कानपूरच्या संशोधकांनी नोंदवल्याचे वृत्त माध्यमांत प्रसिद्ध झाले आहे.
आयआयटीच्या चमूने राज्यातील 235 शहरांना भेटी दिल्या होत्या. वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विनोद तरे यांनी गटार योजनेचा अभ्यास केला होता. नॅशनल अर्बन अफेयर्सच्या अहवालातदेखील शहरांमधील सुमारे 80 टक्के नाले कचर्याने गच्च झाल्याचा निष्कर्ष नमूद असल्याचे त्या वृत्तात म्हटले होते. नागरिकांनी त्यांच्या शहरामधील नाल्यांच्या काठाने एक जरी फेरफटका मारला तरी या निष्कर्षांमधील सत्यता त्यांनाही पटू शकेल. नद्यांचे नाले का होतात? कचर्याने नाले का तुंबतात? प्रशासनाबरोबरच लोकांचीही बेफिकिरी त्याला कारणीभूत आहे.
शहरांच्या लोकसंख्येच्या तुलनेत सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची (एसटीपी) संख्या कमीच आढळते. परिणामी सांडपाणी थेट नदीपात्रात मिसळते. नदीचा नाला होण्याचे ते प्रमुख कारण आहे. त्याविषयी आवाज उठवणे आणि त्याची तड लावण्याचा प्रयत्न करणे हे नागरिकांचे सामाजिक कर्तव्य आहे. त्याबरोबरच लोकांच्या सवयीदेखील त्याला कारण आहे. सुमारे 80 टक्के नाले कचर्याने गुदमरत असतील तर तो कचरा आला कोठून? कचर्याचा पाऊस पडल्याचे अजून तरी ऐकिवात नाही. म्हणजे तो कचरा लोकांनीच फेकलेला असतो.
घराघरांतील कचरा फेकण्याचे नद्या आणि नाले हे लोकांनी त्यांच्या हक्काचे ठिकाण बनवले आहे. माणसे किती कचरा फेकतात? समुद्राला तुफानी भरती येऊन गेल्यावर किनारे कचर्याचे ढिगारे बनतात ते याचे चपखल उदाहरण ठरावे. प्लास्टिकच्या पिशव्या, निर्माल्य, तुटलेले फर्निचर अशा वाटेल त्या वस्तू लोक नदी आणि नाल्यात फेकतात. परिणामी नाले तुंबतात. पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. ते पाणी शहरात म्हणजे काठावरच्या लोकांच्या वस्तीत, घरात घुसते आणि साचते. कारण कचर्यामुळे नाल्यांची आणि नद्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी होते.
रस्त्यावर पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी जाळ्या टाकलेल्या असतात किंवा तशी सोय असलेले ढापे बसवलेले असतात. ती कचरा किंवा उरलेले अन्न टाकण्याची सोय आहे का? पण अनेक जण तसा वापर करताना आढळतात. तेव्हा शहरे अचानक पाण्यात बुडण्याचे सामाजिक वर्तन हेही एक कारण आहे याचे भान लोकांना ठेवावेच लागेल. कारण पुराच्या पाण्याचा फटका लोकांनाच सहन करावा लागतो. त्यांच्याच मालमत्तेचे नुकसान होते. तेव्हा नद्यांची गटार गंगा न करणे आणि नाल्यात कचरा न फेकण्याची सवय अंगी बनवण्याला दुसरा पर्याय नाही.