निसर्गसाखळी, जैवविविधता आणि पर्यावरणाच्या साखळीत डोंगर महत्त्वाची भूमिका बजावतात. ब्रह्मगिरी ही नाशिकची ओळख आणि शान मानली जाते. नाशिकला सुजलाम् सुफलाम् करणार्या गोदावरी नदीसह वैतरणा आणि अहिल्या नदीचे उगमस्थान असलेल्या या बेलाग डोंगराच्या कडेकपारी झाडांऐवजी कचर्याने वेढल्या जात आहेत.
जाणते गिर्यारोहक याकडे समाजाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न सातत्याने करतात. याची छायाचित्रे आणि वृत्त माध्यमांत अधूनमधून प्रसिद्ध होतात. हे चित्रच अस्वस्थ करणारे आहे. नाशिकला भेट देणारे पर्यटक, यात्रेकरू आणि स्थानिक नाशिककर सुद्धा या डोंगराला भेट देतात आणि गोदावरी उगमस्थानचे दर्शन घेतात. तथापि माणसांची हीच गर्दी कचरा वाढण्याचे कारण ठरत आहे. प्लॅस्टिकच्या पिशव्या, खाद्यपदार्थांची रिकामी पाकिटे, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, कागद तिथेच फेकून देण्याची प्रवृत्ती वाढत आहे. हा कचरा साठत जातो आणि डोंगर विद्रुप करतो.
कोणत्याही पर्यटनस्थळाला भेट दिल्यावर परिसर स्वच्छ असावा अशी बहुसंख्यांची अपेक्षा असते. ती रास्तच आहे. तथापि स्वच्छता तशीच राखणे ही पर्यटकांची आणि स्थानिकांची देखील जबाबदारी आहे. दुर्दैवाने याचे भान फारसे आढळत नाही. परिसरात कचरा करण्यात स्थानिकही आघाडीवर आढळतात. स्थानिकांचे देखील याबाबतीत सामाजिक भान सुटलेले आढळते.
एक दिवसाच्या अनेक स्वच्छता मोहिमा राबवल्या जातात. काही टन कचरा संकलित केला जातो. तथापि स्वच्छता ही एक दिवस राखण्याची गोष्टच नाही. ती निरंतर चालणारी सजग प्रक्रिया आहे. ती सामूहिक जबाबदारी आहे. ते भान राखले जात नसल्यामुळे काल स्वच्छ केलेला परिसर दुसर्या दिवशी पुन्हा ‘जैसे थे’ आढळतो. गोदावरी स्वच्छ करतच राहावे लागते. डोंगर-किल्ले सफाईची मोहीम सामाजिक संस्थांना नियमितपणे राबवावी लागते.
एकाने कचरा करायचा आणि दुसर्याने तो साफ करायचा ही प्रक्रियाच अर्थहीन आहे. कचरा निर्माण केला गेलाच नाही, तर तो संकलित देखील करावा लागणार नाही. याबाबतीत मोठ्यांनी लहानांसमोर आदर्श उभा करण्याची गरज आहे. त्यांनी कचरा केला नाही, तर त्यांची मुले करणार नाहीत. त्यांनी स्वच्छता राखली तर तीच सवय त्यांच्या मुलांना लागेल. त्यांनी ब्रह्मगिरीचा आदर राखला तर मुले तेच आचरणात आणतील. मोठ्यांनी त्यांचे वर्तन सुधारण्याची आवश्यकता आहे. तो बदल ज्या दिवशी घडेल तो दिवस सुदिन म्हणून गणला जाईल.