अकरा जुलै २००६ रोजी मुंबईत लोकलमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचे खरे दोषी कोण हा प्रश्न एकोणीस वर्षांनंतरही कायम आहे. यात दोनशे नऊ लोकांचा बळी गेला तर सातशेपेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झाले होते. या निकालाविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. ते सरकारला क्रमप्राप्त होते. कारण सरकारची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
जेव्हा ही भयंकर घटना घडली तेव्हाही राजकारण केले गेले आणि आताही निकालावरून राजकारणाचा आखाडा रंगायला सुरुवात झाली आहे. कदाचित लोकांचे लक्ष यावरून हटवण्यासाठी अन्य मुद्यांना पुन्हा उकळी दिली जाऊ शकेल. बॉम्बस्फोटाचा निकाल लावताना न्यायसंस्थेने संबंधित तपास यंत्रणांवरच मोठा बॉम्ब फोडला आहे. बारा आरोपींपैकी अकरा आरोपींना निर्दोष मुक्त केले. त्याचा ठपका तपास यंत्रणेवर ठेवला आणि साक्षी पुराव्यांमधील फोलपणाचे पुरते धिंडवडे काढले. खर्या गुन्हेगारांना शिक्षा व्हायलाच हवी अशी टिप्पणी केली. ही तपास यंत्रणांसाठी लाजिरवाणी आणि तपासामागील हेतूंवर संशय निर्माण करणारी गोष्ट आहे.
ज्यांना पकडले त्यांच्यावरचे आरोप सिद्ध करण्यात यंत्रणांना अपयश आले. इतया वर्षांनंतर खरे गुन्हेगार कसे शोधणार हा खरा प्रश्न आहे. घटना घडली तेव्हा खरे गुन्हेगार शोधण्यात अपयश आल्याने इतरांना त्यात अडकवून जनतेच्या डोळ्यांत धूळफेक केली गेली, असाही याचा एक अर्थ काढला जाऊ शकेल. देशाच्या सुरक्षिततेशी संबंधित गुन्हेसुद्धा तपास यंत्रणा किती ढिलाईने आणि बेफिकिरीने हाताळते हे यावरून अधोरेखित झाले. दोषींना शोधून शिक्षा करपर्यंतच्या प्रवासाशी संबंधित यंत्रणांमधील मतभिन्नताही सामान्य माणसांना अस्वस्थ करणारी ठरू शकेल. अन्यायग्रस्त सामान्य लोक न्यायासाठी पहिल्यांदा पोलीस स्टेशनची पायरी चढतात.
पोलीस नीट तपास करतील आणि न्याय मिळवून द्यायला मदत करतील अशी अशा त्यांना असते. पण कोणत्या अपेक्षेने यंत्रणांकडे पाहावे अशी भावना लोकांच्या मनात निर्माण झाली तर नवल नाही. कारण न्यायसंस्थेसमोर कोट्यवधी खटले प्रलंबित आहेत. तपास यंत्रणांची ढिलाई हेदेखील त्याचे एक कारण मानले जाते. बॉम्बस्फोट पीडितांच्या मनात बॉम्बस्फोटाच्या जखमा आणि वेदना आजही कायम असतील. यात ज्यांना अपंगत्व आले त्यांचे जगणे म्हणजे त्यांच्यासाठी रोजचेच मरण आहे. या निकालाने त्यांच्या जखमा पुन्हा एकदा भळभळत्या झाल्या असतील. तेही तपास यंत्रणेचेच पाप आहे. यात आता उपरोक्त अकरा जणांच्या कुटुंबियांच्या वेदनांची भर पडेल.





