Wednesday, October 23, 2024
Homeअग्रलेखसंपादकीय : २३ ऑक्टोबर २०२४ - अनुकरणीय उपक्रम!

संपादकीय : २३ ऑक्टोबर २०२४ – अनुकरणीय उपक्रम!

मुलांचे वाचन हा सामाजिक चर्चेचा आणि अनेक घरांमध्ये वादविवादाचा विषय असतो. बहुसंख्य मुले वाचत नाहीत हे बहुसंख्यांचे मत कदाचित खरेही असू शकेल. विविध कारणांमुळे मुलांचे वाचन कमी होत चालले आहे. यावर पालक-शिक्षक-वाचनप्रेमी यांचे एकमत आढळते. तथापि त्यावर मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला तर मार्ग सापडू शकतो, अशी आशा यवतमाळ जिल्ह्यात वनोजादेवी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी जागवली आहे.

विद्यार्थी दररोज चार ते पाच या एक तासात अवांतर वाचन करतात. आठवड्यात एकदा विद्यार्थी त्यांनी वाचलेल्या पुस्तकावर बोलतात. या शाळेची यशोगाथा माध्यमात प्रसिद्ध झाली आहे. गोष्टीच्या पुस्तकांपासून सुरु झालेल्या या उपक्रमात मोठी मुले आता थोरामोठ्यांची आत्मचरित्रे आणि त्यांनी लिहिलेली पुस्तकेदेखील वाचतात, असे शाळेतील शिक्षकांनी सांगितले. विद्यार्थ्यांमधील हा बदल त्या शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांची फारच मोठी उपलब्धी आहे. अन्यथा, स्पर्धेच्या युगाचा पालकांवर फार ताण दिसून येतो. मुलांनी फक्त अभ्यास करावा, अशीच बहुसंख्यांची इच्छा असते. शाळेनेसुद्धा अभ्यासावर भर द्यावा, अशी पालकांची भावना आढळते.

- Advertisement -

परीक्षेत मिळणारे गुण मुलांच्या हुशारीचा आणि शाळेच्या कामगिरीचा मापदंड मानला जातो. काळाच्या ओघात अनेक जण त्याचे समर्थनही करतील कदाचित! तथापि मुलांचे व्यक्तिमत्त्व चौफेर विकसित होणे तितकेच महत्वाचे आहे. त्यात अर्थपूर्ण अवांतर वाचन मोलाची भूमिका बजावते. वनोजादेवी शाळेतील शिक्षकांनी तेच लक्षात घेतले असावे. त्याला पालक आणि विद्यार्थ्यांचा अनुकूल प्रतिसाद मिळाला असावा. वाचनाचे फायदे नव्याने सांगायला नकोत. वाचनाने मुलांचा दृष्टिकोन व्यापक होतो. ते विचारशील बनतात. त्यांचे व्यक्तिमत्त्व स्थिर होण्यास मदत होते.

प्रतिक्रियावादी न होता ते प्रतिसाद द्यायला शिकतात. अशा समतोल सुजाण नागरिकांची समाजाला आज जास्त गरज आहे. वाचनाने मुलांची भाषा समृद्ध होते. हा फार मोठा संस्कार मुलांवर होतो. त्यांचा शब्दसंग्रह वाढतो. भाषेवर प्रभुत्व प्राप्त होते. मुले भाषेवर प्रेम करायला शिकतात. अन्य भाषा शिकण्याची प्रेरणा मिळते. समृद्ध होण्याचा मार्ग यातूनच गवसतो. वनोजादेवी शाळेतील मुलांना तो सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाचनाची गोडी लागली की, तो कायमचा संस्कार होतो. असा अनेकार्थांनी वनोजादेवी शाळेचा उपक्रम प्रशंसनीय आणि इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरावा.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या