सातारा जिल्ह्यातील करंजखोप शाळेतील एका गुरुजींनी पालकांना लिहिलेले पत्र सध्या समाज माध्यमांवर फिरत आहे. मुलांना सुट्टी लागली की त्यांचे बहुसंख्य पालक पुन्हा एकदा कुठे ना कुठे गुंतवण्याचा प्रयत्न करतात. पण उपरोक्त शाळेतील गुरुजींनी चक्क पालकांनाच सुट्टीतील गृहपाठ दिला आहे. तो मुले आणि पालक यांचे सान्निध्य घडवणारा, त्यांच्यात संवादाचा पूल बांधणारा आणि त्यानिमित्ताने मूल्ये रुजवण्याचा प्रयत्न करणारा ठरू शकेल. तो गृहपाठ मुळातच वाचण्यासारखा आणि ठरवले तर अमलातही आणण्यासारखा आहे.
निदान उन्हाळ्याची सुट्टी तरी मुले आणि पालकांनी एकमेकांच्या सहवासात घालवावी, अशी अपेक्षा गुरूजी त्यात व्यक्त करतात. त्यांनी गृहपाठात सुचवलेले उपक्रमदेखील त्यालाच पूरक ठरू शकतील. उदाहरणार्थ, एकवेळचे जेवण सोबत करा, मुलांना पालकांच्या कामाच्या ठिकाणी घेऊन जा आणि त्यांचे पालक कुठे आणि किती काम करतात ते बघू द्या, मुलांना स्थानिक यात्रा किंवा बाजारात घेऊन जा.. अशा किमान पंधरा गोष्टी त्यांनी सुचवल्या आहेत. मुले आणि पालक बरोबर धमाल करू शकतील, सहवासातूनच संवाद घडेल अशाच त्या आहेत. यातून कदाचित मुले त्यांचे मन त्यांच्याही नकळत पालकांजवळ व्यक्त करू शकतील. गुरुजींना हा गृहपाठ पालकांना द्यावासा वाटला याचाच दुसरा अर्थ, पालक-मुले यांच्यातील सहवास आणि संवादाची उणीव त्यांनाही जाणवली असावी.
साधारणतः एक दशकापूर्वीपर्यंत मुले आणि त्यांचे पालक गुरुजींना अपेक्षित पद्धतीने सुट्टी घालवायचे. दुपारी बैठे खेळ, घरकामात मदत आणि संध्याकाळी गल्ल्या किंवा मैदाने दणाणून सोडणे म्हणजे मुलांची सुट्टी. तथापि सध्या सुट्टी म्हणजे डोक्याला ताप अशीच बहुसंख्य पालकांची भावना आढळते. यावर वेळेच्या अभावाचे कारण सहज पुढे केले जाऊ शकेल. तथापि मुलांच्या वाट्याचा वेळ नेमका कोण खाते हे वेगळे सांगायला हवे का? संवादासाठी वेळ कसा काढला जाऊ शकेल हा चर्चेचा वेगळा विषय होऊ शकेल. तथापि, संवादाची गरज बहुसंख्य पालकांना जाणवते की नाही हा खरा कळीचा मुद्दा आहे.
त्याशिवाय त्याचा इतका अभाव गुरुजींना जाणवला नसता. सध्या हा संवाद खूप साचेबद्ध झाला असावा का? म्हणजे अभ्यास करतो ना.. अजून काही पाहिजे आहे का… बाकी विशेष काही नाही ना.. ही प्रश्नोत्तरे म्हणजे संवाद असे झाले असावे का? पण ते फक्त माहितीचे आदानप्रदान ठरू शकेल. गुरुजींनी दिलेल्या गृहपाठाच्या निमित्ताने पालक याचा विचार करतील का? तात्पर्य, सुट्टीत मुलांशी खूप गप्पा मारा, सहवासाचा आनंद घ्या हे गुरुजींचे मागणे पालकांनी मनावर घ्यावे असेच आहे.