सार्वजनिक गणेशोत्सवाचे पडघम वाजत आहेत. अवघ्या काही दिवसांवर आलेल्या उत्सवात सार्वजनिक मंडळांत आणि घरोघरी येणार्या बाप्पांचे स्वागत करण्याची लगबग सुरू आहे. राजाचे आगमन…असे बाप्पांची वर्दी देणारे फलक, ढोल-ताशांचा सराव, सार्वजनिक मंडळांची मंडप उभारणी यामुळे वातावरण निर्मिती सुरू आहे.
दहा दिवसांसाठी येणार्या या लाडक्या पाहुण्याच्या स्वागतासाठी काय आरास करायची याची खलबते घरोघरची बच्चे कंपनी आणि युवांमध्ये सुरू असेल. या उत्साहाला पर्यावरणपूरक वळण दिले जाऊ शकेल. गप्पांमधून पर्यावरण प्रदूषणाच्या समस्येचे गांभीर्य पोहोचवले जाऊ शकेल. शाडूमातीच्या मूर्तींसदंर्भात जनजागृती होत आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसचा मूर्तींऐवजी शाडूमातीच्या किंवा धातूच्या मूर्तींकडे लोकांचा कल हळूहळू का होईना वाढत आहे. तोच दृष्टिकोन सजावटीच्या बाबतीत अंगिकारला जाऊ शकेल.
सजावटीच्या साहित्यातून प्रदूषण वाढणार नाही याची दक्षता घेतली जाणे शक्य आहे. बाजारातील तयार सजावट खरेदी करताना डोळस भूमिका स्वीकारणे शक्य आहे. अलीकडच्या काळात घरगुती आरासही लोक देखणी आणि मनमोहक करतात. सर्जनशील कल्पना लढवतात. त्या अमलात आणण्यासाठी अनेक जण प्रचंड खर्चदेखील करतात. सर्जनशीलतेला पर्यावरणपूरकतेचे कोंदण चढवण्याची आवश्यकता आहे.
नैसर्गिक साधनसंपत्तीचा मर्यादित वापर, घरगुती वस्तू, फुलांच्या कुंड्या, गवत, पणत्या, लाकडी वस्तू, चिकणमातीचे दिवे, भाज्या, फळे-फुले यांचा वापर करून अनोखी सजावट करणे शक्य होऊ शकेल. मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव आणि मोकळीक दिली तर त्यांच्या कल्पना नक्की भरारी घेऊ शकतात. नाशिकमधील अनेक घरगुती गणपती यासाठी प्रसिद्ध आहेत. घरगुती वस्तूंचाच वापर करून ते सजावट करतात. जी बघण्यासाठी लोक गर्दी करतात. यामुळे पर्यावरण रक्षणाला मदत होऊ शकेल.
मुले वस्तूंचा पुनर्वापर शिकू शकतील. अशी सजावट करण्यात घरातील अनेक सदस्य सहभागी होऊ शकतील. त्यांच्यात चर्चा झडतील. वादविवाद रंगतील आणि कोणाच्या तरी एकाच्या कल्पनेवर एकमत करायला हवे, हेही लक्षात येऊ शकेल. यानिमित्त कुटुंब एकत्र येईल आणि त्यांच्यात संवादाचा पूल तयार होऊ शकेल. ज्याची आज सगळ्यात जास्त उणीव भासते. माणसांना एकत्र आणणे हा गणेशोत्सवाचा एक मुख्य उद्देश मानला जातो.
तोही साध्य होऊ शकेल. पर्यावरणपूरक उत्सवाच्या जाणिवेचे असे अनेक फायदे सांगितले जाऊ शकतील आणि फायद्याची गोष्ट सर्वांनाच आवडते. त्यात गैर काहीच नाही. तेव्हा सामाजिक फायद्याचा दृष्टिकोन रुजवण्याची अपेक्षा करायला काय हरकत आहे?