महाराष्ट्राला गडकिल्ल्यांचा संपन्न वारसा आहे. छत्रपतींच्या कर्तृत्वाची, इथल्या मातीतील पराक्रमाची आणि तो वारसा समर्थपणे पेलणार्या असंख्य वीर व्यक्तिमत्वांची साक्ष देतात. अकरा किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळवण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. अनेक किल्ले स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना आहेत. किल्ल्यांवर अतिक्रमणाचा मुद्दा अधूनमधून चर्चेत असतो. किल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी सरकारने कृती दल (टास्क फोर्स) स्थापन केले असून अतिक्रमणे काढणार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी नुकताच केला. किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव प्रसंगी ते बोलत होते. हा मुद्दा याआधीही अनेकदा वादाचा बनलेला आढळतो.
अनेक किल्ल्यांवर अतिक्रमणे असल्याचा दावा केला जातो. ते काढण्यासाठी आंदोलन झडतात. निधीही मंजूर केल्याचे वृत्त माध्यमात झळकते. पण पुढे काय होते ते लोकांना कधीच का कळत नसावे? वास्तविक गडकिल्ले पराक्रमचा इतिहास सांगतात. मनावर घेतले तर सामान्य माणसेही क्रांती घडवू शकतात याचा विश्वास पेरतात. अशा वारशावर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होणे कायदेशीर नाही. किल्यांचे संवर्धन केले जायला पाहिजे ही लोकांची अपेक्षाही त्या अर्थाने गैर नाहीच. काळाचा मारा सहन करत किल्ले वर्षानुवर्षे उभे आहेत. त्याकारणे त्यांची पडझड होणे स्वाभाविक मानले जाऊ शकेल. अतिक्रमण मात्र नाही. तथापि त्यांच्या संवर्धनाची आणि अतिक्रमण मुक्त करण्याची आठवण फक्त निमित्तानेच येत असावी का? कारण संवर्धन ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे.
युवांनी, विद्यार्थ्यांनी गडकिल्ले फिरून पराक्रम जाणून घेण्यासाठी ते सुस्थितीत असायला हवेत. त्यामुळे नव्याने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी सरकार करेल का? तसे झाले तर या मुद्यावरून राजकारणाला संधी मिळू शकणार नाही. युवांची माथी फिरवण्याला मुद्दा मिळू शकणार नाही. पण अतिक्रमणाच्या बाबतीत एक परिस्थिती नेहमी आढळते. वातावरण शांत झाले की अतिक्रमण पुन्हा होते. किल्यांच्या बाबतीत तसे घडू नये यासाठी स्थानिकांना सहभागी करून घेतले जाऊ शकेल. स्थानिक मंडळी किल्यांवर जात-येत असतात. नियमित गिर्यारोहण करणारे समूह देखील आहेत. ते किल्ले राखण्याचे काम त्यांच्या परीने करतच असतात.
हे सगळे याबाबतीत जागल्याची भूमिका पार पाडू शकतात. पण केवळ अतिक्रमणांमुळे पराक्रमाला बाधा येते का? सामाजिक भान हरवलेले अनेक पर्यटक त्यांची नासधूस करतात. कचरा करतात. युवांची टोळकी धुडगूस घालतात. मद्यपार्ट्या करतात. किल्यांच्या दगडांवर नावे कोरतात. जोडपी जाऊन बसतात. अलीकडे तर मंदिरे आणि छोटे मोठे किल्ले विवाहापूर्वीच्या शुटींगची हक्काची ठिकाणे बनलेली आढळतात. हे प्रकार देखील बंदच व्हायला हवेत. वारसा जतन करणे हे लोकांचे देखील काम आहे हा विचार रुजायला हवा. याबाबतीत अभावानेच आढळणारी जागरूकता वाढायला हवी.