Tuesday, March 25, 2025
Homeसंपादकीयसंपादकीय : २४ मार्च २०२५ - संवेदनशीलता रुजवणारा उपक्रम

संपादकीय : २४ मार्च २०२५ – संवेदनशीलता रुजवणारा उपक्रम

बदलत चाललेले निसर्गाचे रंगढंग, तापमान आणि हवामान हा जागतिक चिंतेचा विषय आहे. त्याचे तीव्र फटके समाज सहन करतो. पाऊस लहरी होत आहे. पूर, दुष्काळ, वादळे अशा नैसर्गिक आपत्ती कधीही कोसळतात. त्यामुळे शेती उद्ध्वस्त होत चालली असून, तिच्यावर अवलंबून असलेली अन्नसुरक्षा धोक्यात येते. या सगळ्याचे समाजव्यवस्थेवर गंभीर परिणाम होतात. यावर जागतिक स्तरावर बरेच काही घडते. तथापि तापमान बदलला सामान्य माणसांचाही कळत-नकळत हातभार लागतो. परिणामी सामान्य माणसेही छोटे छोटे बदल अंगीकारून त्याची तीव्रता कमी करू शकतात याच जाणिवेचा खोलवर अभाव आढळतो.

एकूणच युवा पिढीत निसर्गाविषयीची संवेदनशीलता आणि प्रेम रुजवणे गरजेचे आहे. त्याची सुरुवात विद्यार्थीदशेत झाली तर जाणिवा खोलवर रुजण्यास मदतच होऊ शकेल. नाशिक जिल्ह्यात धोडंबे येथील एका शाळेत पार पडलेला उपक्रम यादृष्टीने दखलपात्र ठरू शकेल. जागतिक चिमणीदिनानिमित्त या शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वरचित कवितांची स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी रचलेल्या कविता सादरही केल्या. निसर्गसाखळीतील चिमणीसारख्या छोटुशा पक्ष्याचा त्यांनी केलेला विचार आनंददायी ठरावा.

- Advertisement -

‘चिऊताई चिऊताई असली घाई बरी नव्हे, मी बनवलेल्या घरट्यात अंगाई गायला लाजू नये’ ही त्यापैकी एक कविता. यानिमित्ताने झाडांची आणि परिणामी पक्ष्यांच्या घरट्यांची कमी होत चाललेली संख्या, निसर्गसाखळीतील चिमणीसारख्या अनेक इटुकल्या पक्ष्यांचे महत्व, त्यांच्या बदलत चाललेल्या सवयी, कमी होत चाललेली संख्या अशा असंख्य गोष्टी मुलांच्या लक्षात येऊ शकतील. निसर्गाजवळ नेणारे असे अनेक उपक्रम आयोजित केले जाऊ शकतील. निसर्गावरची व्याख्याने, टॉक शो, स्लाईड शो, तज्ज्ञांशी गप्पा, एकदिवसीय सहली, त्यांच्या त्यांच्या परिसरातील बागेला भेट अशा अनेक उपक्रमांचा त्यात समावेश करता येऊ शकेल.

संस्कारांची रुजवण ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. अशा उपक्रमांना पालकांनी देखील साथ देणे शिक्षकांना अपेक्षित असेल. उपक्रमांमधून देखील शिकणेच होते. निसर्गाच्या सान्निध्यात रमणे म्हणजे वेळ वाया घालवणे नव्हे. ज्या निसर्गावर मानवाचे अस्तित्व अवलंबून आहे त्याचा संबंध योग्य वयात उलगडून दाखवला जायला हवा. ‘एखाद्याशी मैत्री जमवण्याचा उत्तम उपाय म्हणजे आपण आपल्या मैत्रीचा हात त्याच्या पुढे करणं’ असे पु.ल. देशपांडे म्हणत. तेव्हा असे उपक्रम शाळांपुरते मर्यादित राहू नयेत. समाजाने यासाठी पुढाकार घ्यायला हवा. निसर्ग टिकला तरच मानवाचे अस्तित्व टिकेल हे सारेच जाणून आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...