Tuesday, March 25, 2025
Homeअग्रलेखसंपादकीय : २५ फेब्रुवारी २०२५ - शांत नाशिक;सुंदर नाशिक

संपादकीय : २५ फेब्रुवारी २०२५ – शांत नाशिक;सुंदर नाशिक

प्रत्येक शहराची एक ओळख असते. जसे की देहू-आळंदी म्हणजे संतांची भूमी. सोलापूर म्हटले की चादरी. जळगाव म्हटले की केळी. त्या त्या शहरांची नावे घेतली की या गोष्टी लोकांना आपसूकच आठवतात. त्यासाठी स्मरणशक्तीला वेगळा ताण द्यावा लागत नाही.तद्वतच नाशिक म्हटले की थंड हवेचे ठिकाण, तीर्थक्षेत्र आणि शांत वातावरण लोकांना आठवते. अनेक प्रभावशाली व्यक्ती नाशिकमध्ये घर घेण्याची इच्छा बोलून दाखवताना आढळतात. नव्हे अनेक जण घेतातही. नाशिकचे हवामान आणि सामाजिक वातावरण त्यांना आकर्षित करते असे ते सांगतात. कोणत्याही शहराचे सामाजिक वातावरण शहराच्या प्रगतीची दिशा ठरवते असे म्हटले जाते.

उद्योग विकसित होण्याचे शांत सामाजिक वातावरण हे एक महत्वाचे कारण मानले जाते. पर्यटकांचीही अशाच शहरांना पसंती आढळते. नाशिकला प्रबोधनकार संत गाडगेबाबांचा सहवास लाभला. थोर समाजसुधारक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे नाशिकचेच. रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उष:काल असा आशावाद पेरणारे कुसुमाग्रज ही नाशिकची साहित्यिक ओळख. अशा शहराचे छोट्या मोठ्या कारणांवरून सामाजिक वातावरण वारंवार ढवळून निघणे आणि शहर अशांत राहणे सामाजिक हिताचे ठरू शकेल का? नाशिकमध्ये अवैध धंदे, दरोडे, चोर्‍यामार्‍या, अतिक्रमणे वाढत आहेत. अतिक्रमणांमुळे शहराचा श्वास गुदमरतो. सामाजिक स्वास्थ्य ढवळून निघते. वाहतुकीचा बोजवारा उडतो.

- Advertisement -

पदपथ नाहीसे होतात. रस्तोरस्तींच्या अतिक्रमणांमुळे एकमेकांप्रती द्वेष वाढतो. शिवाय कायदे धाब्यावर बसवण्याची वृत्ती बोकाळते. यामुळे तथाकथित भाई आणि दादांचे आकर्षण वाढते. राजकीय स्वार्थ आणि आकर्षणामुळे त्याला खतपाणी मिळते. संविधान महत्वाचे असे म्हणताना त्याप्रमाणे वागणे मात्र बहुसंख्य विसरत असावेत का? किंवा कोणत्याही मुद्द्यांचा सोयीस्कर वापर करण्याची सवय जडत चालली असावी का? परिणाम ताणतणाव आणि अस्थिरता. ती ओळख कोणत्याही शहराला परवडेल का?

नाशिकचा विकास व्हावा, रोजगार उपलब्ध व्हावेत, पर्यटन बहरावे असे वाटत असेल तर नाशिकची मूळ ओळख जपण्याला पर्याय नाही हे नाशिककरांच्या लक्षात येऊ शकेल का? ती जपायची असेल तर संयम, सहनशीलता, परस्पर सहकार्य, समभाव, संविधानाचाच आदर यांची रुजवण करण्यावर भर देणे आवश्यक आहे. ती जाणत्यांची जबाबदारी आहे. बेरोजगारी हा तरुणाईचा शाप मानला जातो. अस्वस्थ सामाजिक वातावरण रोजगारांच्या मुळावर घाव घालते हे युवा लक्षात घेतील का? कुंभमेळा होऊ घातला आहे. रोजगार निर्मितीची मोठीच संधी उपलब्ध होणार आहे. त्यासाठीचे विचारमंथन आत्तापासूनच सुरु होऊ शकेल का? त्याला प्राधान्य दिले जाऊ शकेल का? राजकारणी सुद्धा शहराचे हित लक्षात घेऊन शांत नाशिक ही ओळख जपण्याला प्राधान्य देतील का?

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...