Sunday, September 8, 2024
Homeअग्रलेखसंपादकीय : २५ जुलै २०२४ - याचे भान कधी येणार?

संपादकीय : २५ जुलै २०२४ – याचे भान कधी येणार?

इंटरनेटच्या वापरकर्त्यांची संख्या ज्या गतीने वाढत आहे त्यापेक्षा जास्तच गतीने सायबर फसवणुकीचे प्रमाण वाढत आहे. चुकीने केलेल्या एका क्लिकमुळे माणसांचे बँक खाते पूर्णतः लुटले जाण्याच्या घटना अगदी रोजच घडतात. सामान्य माणसांची फसवणूकही साधारणतः त्याच त्याच पद्धतीने होताना आढळते.

माणसे पासवर्ड सांगतात किंवा ओटीपी सांगून मोकळे होतात. त्याचा त्यांना पस्तावा होण्याच्या आत ते लुटले जातात आणि मग नेमके काय करावे हे त्यांचे त्यांनाच कळेनासे होते. वास्तविक अशी फसवणूक टाळण्याचे उपाय सरकार आणि सामाजिक संस्था सतत कानीकपाळी ओरडून सांगतात. फलक लावतात. ब्लॉग लिहितात. युट्यूबवर व्हिडिओ टाकतात. म्हणजे ज्या ज्या पद्धतीने लोकांना किमान सावधान करणे किंवा तेवढ्यापुरते साक्षर करणे शक्य होऊ शकेल ते सगळे उपाय अमलात आणतात.

- Advertisement -

फोनवर ओटीपी किंवा पासवर्ड सांगू नका. एकच पासवर्ड सगळ्या ठिकाणी वापरू नका. तुमची वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तींना शेअर करू नका. मोबाईल स्क्रीन लॉक करण्यासाठी खूप साधे पासवर्ड वापरू नका. संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका असे आवाहन सातत्याने केले जाते. बँक कधीही तुमची माहिती फोनवर विचारत नाही या इशार्‍याचाही त्यात समावेश असतो. याशिवाय अनेक पद्धतीने फसवणूक करण्याचे नवनवे मार्ग शोधून काढले जातात. त्याविषयीदेखील तज्ज्ञ वारंवार माहिती प्रसिद्ध करतात.

तरीही लोक त्याच त्याच चुका कशा करत असावेत? सायबर असाक्षरता हे त्याचे एक प्रमुख कारण मानले जाते. ते खरेही असेल. तथापि ज्या माध्यमाच्या मदतीने आर्थिक व्यवहार करायचे त्याची किमान आवश्यक माहिती करून घेणे किंवा साक्षर होणे ही लोकांचीदेखील जबाबदारी नाही का? अशी फसवणूक झाली तर तक्रार कुठे करायची हे किती जणांना माहीत असते? सरकारी पोर्टल आहे. अनेक अ‍ॅप आहेत. पण त्याचा योग्य वापर किती जण करू शकत असतील? ते माहीत करून आणि शिकून घ्यावे, असा प्रयत्न किती जण करतात? पार्ट टाईम जॉब देणे, व्हिडिओ लाईक करण्याचे पैसे कमवा अशा अनेक लिंक्स लोकांना येतात.

तथापि अनोळखी लिंकवर क्लिक करण्याचा मोह लोक का टाळू शकत नसावेत? झटपट पैसे कमावण्याचे कोणतेही मार्ग नसतात याचा विसर लोकांना अशावेळी का पडत असावा? कष्ट न करता पैसे कमावण्याची हाव हे याचे कारण असू शकेल का? लाखो लोकांना नोकरीची गरज असते हे खरेच. पण त्यासाठीचे विश्वासार्ह स्रोत माहीत करून घेणे ही ज्याची त्याचीच जबाबदार नाही का? याचा विचार लोकांनी करण्याची गरज आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या