Thursday, January 8, 2026
Homeअग्रलेखसंपादकीय : २५ सप्टेंबर २०२४ - आरोग्यपूर्ण आयुष्यासाठी

संपादकीय : २५ सप्टेंबर २०२४ – आरोग्यपूर्ण आयुष्यासाठी

आहार आणि विहाराच्या बदलत्या सवयी माणसाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी घातक ठरत असल्याचा निष्कर्ष अनेक सर्वेक्षणे नोंदवतात. ‘लॅन्सेन्ट’चा असाच एक अहवाल आणि त्याचे निष्कर्ष याविषयीचे वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाले आहे. ब्रेन स्ट्रोकच्या घटनांमध्ये आणि त्यात होणार्‍या मृत्युंमध्ये वेगाने वाढ होत आहे.

खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि बदलती धावपळीची दिनचर्या हे त्याचे एक प्रमुख कारण असल्याचे त्यात म्हटले आहे. या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी ताजे आणि आरोग्यदायी जेवण आणि नियमित व्यायाम आवश्यक असे उपाय त्यात सुचवले आहेत. हे उपाय केवळ ब्रेन स्ट्रोकसाठीच उपयुक्त नाहीत तर मानवाला किमान आरोग्य प्राप्तीसाठी देखील गरजेचे मानले जातात. कारण उपरोक्त बदलत्या सवयीचे अनेक दुष्परिणाम माणसांवर होत आहेत.

- Advertisement -

मधुमेह, कॅन्सर, रक्तदाब, हृदयविकार, संधिवात अशा अनेक दुर्धर शारीरिक व्याधी तरुण वयात गाठत आहेत. याशिवाय नैराश्य, अती चंचलता, निद्रानाश, चिंता, भावनिक चढ-उतार, आक्रमकता किंवा क्रोध अशा अनेक प्रकारच्या मानसिक विकारांसाठी चुकीच्या सवयी पूरक ठरू शकतात, असे तज्ज्ञ म्हणतात. आरोग्याचा मार्ग पोटातून जातो असे ज्येष्ठ मंडळी सांगतात. अनेकांचे आजी-आजोबा त्यांच्या वयाच्या ऐंशीतही तंदुरुस्त असतात. त्याचे इंगित त्यांच्या दिनचर्येत दडलेले असते. तथापि बहुसंख्यांचे वर्तन त्याच्या विपरीत आढळते.

YouTube video player

सध्या घरचे ताजे खाणे माणसे विसरत असून जंक फूड आणि खाऊ गल्लीतील पदार्थ खाण्याचे प्रमाण प्रचंड वाढलेले आढळते. माणसांचे कामाचे स्वरूप बदलत आहेत. वेळेच्या मर्यादा कमी होत आहेत. त्याचा परिणाम ताण-तणाव वाढण्यात आणि आहार-विहारावर होतो. तथापि भारताला आयुर्वेदाची आणि तो वारसा चालवणार्‍या घराण्यांची संपन्न परंपरा आहे. आयुर्वेद पद्धती माणसाच्या सर्वांगीण आरोग्याचा विचार करते.

आधुनिक जीवनशैलीत देखील माणसे त्यांचे किमान आरोग्य कसे जपू शकतात याचा विचार बदलत्या काळानुसार करण्याची लवचिकताही अनेक डॉक्टर्स घेतांना आढळतात. उदाहरणार्थ, अनेकांना रात्रपाळीत काम करावे लागते. त्यांची दिनचर्या सामान्यांच्या विपरीत असू शकेल. तथापि त्यांचाही विचार केला जाताना आढळतो. याबरोबरीने छोट्या छोट्या बदलांची सुरुवात झाली आहे. अनेकांचा घरच्या खाण्याकडे ओढा वाढत आहे.

घरचे ताजे अन्न जिथे मिळू शकेल त्या जागांना माणसे प्राधान्य देऊ लागली आहेत. त्यांची संख्या वेगाने वाढायला हवी. तात्पर्य, व्याधींना दूर ठेवायचे असेल तर खाण्या-पिण्याच्या सवयीत आरोग्यपूर्ण बदल अपरिहार्य आहेत असेच अनेक अहवाल सुचवतात.

ताज्या बातम्या

Nashik Crime : पैशांवरून बालमित्रांत वैर; वसुलीसाठी थेट जाळपोळ

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बालपणापासूनची घट्ट मैत्री, वर्षानुवर्षांचा विश्वास आणि त्यातून झालेले कोट्यवधींचे आर्थिक व्यवहार अखेर गंभीर वैरात बदलून थेट जाळपोळीपर्यंत पोहोचल्याची खळबळजनक घटना...