Saturday, April 26, 2025
Homeअग्रलेखसंपादकीय : २६ एप्रिल २०२५ - मैत्रीतील मंदी परवडणारी नाही

संपादकीय : २६ एप्रिल २०२५ – मैत्रीतील मंदी परवडणारी नाही

मैत्रीचे नाते सर्वांना कायमच भुरळ घालते. तिचे वर्णन करताना साहित्यिकांच्या शब्दांना धुमारे फुटतात. कवींना कविता स्फुरतात. जिवलग मित्रांच्या भेटीच्या अनेक कथा, गोष्टी आणि कविता घराघरांतील मुलांना नेहमीच ऐकवल्या जातात. ‘देव माझा सांगून गेला पोटापुरतं कमव पण जिवाभावाचे मित्र जमव’ असे कवी अनंत राऊत म्हणतात. ‘मैत्रीला कुठल्याही तराजूत तोलता येत नाही. जीवाला जीव देणारी ही मैत्री कायमस्वरुपी आपल्या सोबत असते’ असे पु. ल. देशपांडे म्हणतात. अशी मैत्री अमेरिकेत हार्वर्ड विद्यापीठातील संशोधकांच्या सर्वेक्षणाचा विषय बनली. त्या सर्वेक्षणाचा माध्यमात आलेला प्रमुख निष्कर्ष मात्र काहीसा अस्वस्थ करणारा आहे.

जागतिक स्तरावर वेगवेगळ्या क्षेत्रात मंदी येते. जिवाभावाच्या मैत्रीतही मंदीने शिरकाव केल्याचे आणि एकही जवळचा मित्र नाही असे सांगणार्‍या व्यक्तींची संख्या वाढत असल्याचे त्यात म्हटले आहे. या मंदीचे मानसिक आणि शारीरिक परिणामही त्यात नमूद असल्याचे वृत्तात म्हटले आहे. सर्वेक्षण अमेरिकेतील असले तरी आपल्याकडेही माणसे एकटी होत चालल्याचे आढळायला लागले आहे. हातात मोबाईल असेल तर माणसांना इतर कोणीही नको असते. म्हणूनच समाज माध्यमांवर ढीगभर मित्र असणार्‍यांच्या आयुष्यात मित्रांचा दुष्काळ असतो, ही भावना सध्या प्रचलित आहे.

- Advertisement -

माणसे स्वतःत अधिकाधिक गुंतत चालली आहेत. मैत्रीत मंदी होण्याची काही ढोबळ कारणे शोधली जाऊ शकतील का? जसे की, अति अपेक्षा, भावनांची खिल्ली उडवणे, त्या समजून न घेणे, गृहीत धरून बोलणे, मित्राच्या वैयक्तिक गोष्टी इतरांना सांगणे म्हणजेच त्याचा विश्वासघात करणे इत्यादी. तथापि आयुष्यात मित्र नसण्याचे तोटे यापेक्षा जास्त सांगितले जाऊ शकतील. सामाजिक एकटेपणा हृदयरोग, डिमेन्शिया आणि मृत्यूचा धोका वाढवतो. इतरही छोटे-मोठे परिणाम होतात. हे परिणाम गंभीर आणि आयुष्य पणाला लावणारे आहेत.

एकटेपणाच्या नादात ते पत्करण्यापेक्षा मैत्री जपणे आणि जोपासणेच माणसाच्या हिताचे आहे. कारण माणूस समाजशील प्राणी आहे. विविध सणांच्या आणि उत्सवांच्या माध्यमातून त्याला खतपाणी घातले गेले आहे. कारण व्यावहारिक भाषेत मैत्रीचे अनेक फायदे सांगितले जाऊ शकतील. पण खरी मैत्री या सर्वांच्या परे असते. अनेक जण ती जोपासताना आढळतात. वर उल्लेखिलेली कारणे सहज टाळली जाऊ शकतील. माफ करा.. माफी मागा आणि मैत्रीच्या सुंदर स्मृती निर्माण करा. ते सर्वांच्याच हातात आहे.

अर्थात ते घडवून आणण्यासाठी अहंकाराचा आणि अपेक्षांचा त्याग मात्र करावा लागतो. स्वतःला कायम तपासत राहावे लागते. पण एकदा का ही जादूची किल्ली माणसाला गवसली की पु. ल. देशपांडे वर्णन करतात तशी मैत्री फुलते. रोज आठवण यावी असे काही नाही, रोज भेट व्हावी असे काही नाही, एवढेच कशाला रोज बोलणे व्हावे असेही काहीच नाही; पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री आणि तुला याची जाणीव असणे ही झाली मैत्री. शेवटी काय हो भेटी नाही झाल्या तरी गाठी बसणे महत्त्वाचे. ज्यांनी हे जाणले त्यांनी माणसातले माणूसपण जाणले. तेव्हा मैत्री फुलवणेच हिताचे आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...