राज्याची सार्वजनिक आरोग्य व्यवस्था विविध कारणांनी चर्चेत असते. त्यात उणिवांचाच समावेश जास्त प्रमाणात आढळतो. तथापि सरकारने घेतलेला निर्णय कदाचित परिस्थितीत बदल करणारा ठरू शकेल. नव्याने नेमल्या जाणार्या आरोग्य अधिकार्यांनी त्यांचे नोकरीचे पहिले आरोग्य केंद्र दत्तक घेण्याची संकल्पना आरोग्यमंत्र्यांनी मांडली. तिला सुमारे शंभरपेक्षा जास्त नवनियुक्त आरोग्य अधिकार्यांनी प्रतिसाद दिला असल्याचे वृत्त माध्यमांत नुकतेच प्रसिद्ध झाले.
दत्तक केंद्राच्या सर्वांगीण कार्यपद्धतीवर त्यांनी लक्ष देणे अपेक्षित आहे. आरोग्य केंद्र इमारतीची अवस्था, रुग्णवाहिका आहे की नाही, जैविक कचर्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली जाते की नाही, वेगवेगळ्या रुग्ण कक्षांची अवस्था, लसीकरण वेळापत्रक, शस्त्रकिया विभाग असा सर्व आढावा त्यांनी घ्यावा हा या संकल्पनेमागचा उद्देश असल्याचे मंत्र्यांनी माध्यमांना सांगितले. ‘पहिलेवहिले’ याविषयी जिव्हाळा वाटणे हा मानवी स्वभाव मनाला जातो.
शाळेचा, परीक्षेचा पहिला दिवस, पहिला पाऊस, पहिला प्रवास, पहिली भेट अशा अनेक मुद्यांच्या आठवणी माणसे आयुष्यभर जपतात. त्यात आता पहिली नोकरी जोडली गेली आहे. त्यामागच्या भावना आणि उद्दिष्ट जाणून घेऊन तो अमलात आणला गेला तर कदाचित काही उणिवा दूर होऊ शकतील. आरोग्य व्यवस्थेविषयी लोक तर तक्रारी करतातच पण ‘कॅग’नेदेखील त्यांच्या अहवालात ताशेरे मारले आहेत. या व्यवस्थेतील पायाभूत सुविधा आणि आरोग्यसेवांचे व्यवस्थापन यासंदर्भातील 2016 ते 2022 दरम्यानचा अहवाल विधिमंडळासमोर नुकताच ठेवला गेला. विशेषतः मनुष्यबळ कमतरतेवर त्यात कॅगने भर दिल्याचे प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे.
आहारसेवा, रुग्णवाहिका उपलब्धता,अग्निसुरक्षा लेखापरीक्षण, आपत्कालीन सेवा अशा अनेक पातळ्यांवरील कमतरतांचा अहवालात उल्लेख आहे. जो बहुसंख्य रुग्णांचाही अनुभव आहे. डॉक्टर-कर्मचारी उपलब्ध नसणे, औषधांची कमतरता, प्रचंड गर्दी, नादुरूस्त यंत्रसामुग्री याचा अनुभव बहुसंख्य रुग्ण घेतात. पण याबाबतीत बहुसंख्यांचा नाईलाज असतो. आर्थिक परिस्थितीअभावी त्यांना सरकारी आरोग्यसेवेचाच आधार घ्यावा लागतो. तेव्हा नवीन नोकरीत अधिकारी केंद्र दत्तक घेतील.
स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्नही त्यातील अनेक जण कदाचित करतील. अर्थात, शासकीय नोकरीत स्वतःला सिद्ध करण्याची वृत्ती अभावाने आढळते हा भाग अलाहिदा. पण आरोग्यसेवेत समूळ सुधारणा गरजेच्या आहेत. त्यासाठी अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद व्हायला हवी, असे तज्ज्ञ म्हणतात. अर्थात, यंत्रणेच्या कामकाजाच्या आखीव ठाशीव चौकटीतही अनेक अधिकारी चौकटीबाहेरचा दृष्टिकोन स्वीकारतात. कामकाजाला मानवी चेहरा प्रदान करण्याचा प्रयत्न करतात. दत्तक पालक आरोग्य अधिकार्यांनी रुग्णांच्या व्यथा मानवतेच्या दृष्टिकोनातून समजून घेतल्या आणि उपचारांची शर्थ केली तरी पुरे ठरू शकेल.