इयत्ता अकरावी आणि अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमांचे दिवस आहेत. ज्यांनी वेगवेगळ्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशपरीक्षा दिल्या आहेत त्यांना निकालाची प्रतीक्षा आहे. ज्यांना दहावी आणि बारावीत त्यांच्या अपेक्षेप्रमाणे गुण मिळालेले नाहीत त्यांना पुढील अभ्यासक्रम प्रवेशाचा ताण आला असेल. विशेषतः ज्यांना कमी गुण मिळाले त्यांना आता नेमका कोणत्या शाखेत प्रवेश घ्यावा किंवा मिळेल याविषयी संभ्रमावस्था आहे.
विद्यार्थी जगतात सध्या अशा संमिश्र भावना आढळतात. त्याचे उत्तर आगामी काळात त्यांना मिळणारच आहे. तथापि गुणांचे निश्चित केलेले ध्येय साध्य का झाले नाही यासाठी आत्मपरीक्षण ते करतील का? अर्थात, त्या चिंतनाचा उपयोग भविष्याची वाटचाल सुकर व्हावी यासाठीच व्हायला हवा. पण ते करतांनाही परीक्षा आणि त्यात मिळणारे गुण हा आयुष्यातील एक टप्पा आहे. त्यामुळे कोणत्याही परीक्षेत मनासारखे यश नाही मिळाले किंवा अपयश आले तरी मुलांनी खचून जाऊ नये. प्रत्येक मुलामध्ये काही ना काही क्षमता असते. मुले क्रियाशील व सर्जनशील असतात. गुण कमी मिळाले म्हणून ती कमी होऊ न देणे मुलांच्याच हातात असते. एक दरवाजा जेव्हा बंद होतो तेव्हा अन्य दरवाजे उघडतात असे म्हणतात. विद्यार्थी त्यांचे भविष्य घडवू शकतील अशी नवनवी माध्यमे उपलब्ध होत आहेत. शोधाल तेवढे मार्ग आहेत. काही काळापूर्वी कोणी विचार देखील केला नसता अशी रोजगाराची नवनवी क्षेत्रे उदयास आली आहेत, येत आहेत. शिवाय काळ विविध कौशल्यांचा देखील आहे.
या क्षेत्रांची माहिती, त्यासाठीचे आवश्यक कौशल्य, किमान शैक्षणिक पात्रता मुले नक्कीच कमावू शकतात. संधी प्रत्येकाचे दार ठोठावते असे मानले जाते. ती संधी मिळवून तिचे सोने करण्याइतका चाणाक्षपणा मुलांनी दाखवणे अपेक्षित असते. मुले अडनिड्या वयाचीच असतात. त्यांना समजावून घेणे पालकांचे कर्तव्य आहे. स्वाभाविक आवड शोधण्यात आणि भविष्याचे क्षेत्र शोधण्यात पालक मुलांना मदत करू शकतील. मुलांनी संवाद साधावा आणि त्यांच्या मनीचे गुज सांगावे इतके खेळीमेळीचे आणि मोकळे वातावरण घरात पालक निर्माण करू शकतील.
काहीही झाले तरी चुकीच्या मार्गावर मुलांचे पाऊल पडू नये ही पालकांची देखील जबाबदारी असते. हा बदल घडवून आणायचा कसा, याचा सल्ला काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी मुलांना दिला आहे. आई-वडिलांशी संवाद साधा, पहाटे लवकर उठा, व्यायाम आणि ध्यानधारणा करा, मन शांत ठेवा, असे त्यांनी सुचवले आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्याचे महत्त्व वेगळे सांगायला नको. त्यादृष्टीने उपरोक्त सल्ला अनुकरणीय आहे.