Wednesday, January 7, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : २७ ऑगस्ट २०२५ - जीवघेणा वेडाचार

संपादकीय : २७ ऑगस्ट २०२५ – जीवघेणा वेडाचार

समाज माध्यमांवरील रिल्सचे वाढते वेड जीवघेणे बनले आहे. मागच्या अनेकांना ठेच बसूनही माणसे याबाबतीत शहाणे व्हायला तयार नाहीत. काहीही करून प्रसिद्ध व्हायचा हा हव्यास माणसाला स्थळ-काळ आणि वेळेचे भान विसरायला भाग पाडतो. याची कितीतरी उदाहरणे अवतीभवती आढळतात. कोणी बाळाला फेकून देतात. एकाने तर चक्क राजस्थानच्या विधानसभा अध्यक्षांच्या गाडीलाच चकमा द्यायचा प्रयत्न केला. मध्य प्रदेशमधील एका अकरा वर्षांच्या मुलाला रिल बनवताना खरोखरचा फास बसला.

नाशिकमध्ये तर क्रिकेट सामन्यातील विजय साजरा करण्याच्या नादात युवांनी अग्निशमन दलाची गाडी अडवली आणि त्यावर चढून अंगविक्षेप केले. विशेष म्हणजे त्यांनीच फेकलेल्या फटाक्यांमुळे लागलेली आग विझवायला ती गाडी आली होती. कोणी धावत्या गाडीला लटकतात. रेल्वेच्या डब्यावर चढतात. रेल्वे रुळावर झोपतात. डोंगराच्या कड्यावर अगदी टोकाला जातात. हे मार्ग निसरडेच. त्यामुळे त्यात अनेकांचा जीवदेखील जातो. नद्या, नाले आणि धबधबे उधाणले आहेत. अशा ठिकाणी अतिधाडस करू नये, इतकी साधी गोष्ट त्या तरुणाला कळली नाही. तुफान वेगाने वाहणार्‍या धबधब्याजवळ रिल्स बनवण्याच्या नादात तो वाहून गेला. बघणारे काहीही करू शकले नाही. ही घटना नुकतीच ओडिशात घडली.

- Advertisement -

अधूनमधून घडणार्‍या अशा घटनांमधील राज्याचे, जिल्ह्याचे किंवा गावाचे संदर्भ फक्त बदलतात. वेडेपणा तोच आढळतो. याला माणूसपणाची लक्षणे तरी म्हटले जाऊ शकेल का? माकडाचा माणूस झाला असे डार्विनचा सिद्धांत सांगतो. पण समाज माध्यमांच्या चुकीच्या प्रभावामुळे तात्पुरते का होईना पण माणसाचे पुन्हा माकड बनत असावे का? त्याशिवाय माणसे अशा वेड्यावाकड्या उड्या मारतील का? दुर्दैवाने अशा विचित्र गोष्टी करणे, अतिरेकी धाडस करणे, जीव धोक्यात घालणे, पंचमहाभूतांची ताकद विसरून त्यांना गृहीत धरून काहीतरी करणे यालाच हिरोगिरी मानतात. लोकही त्यांना पसंती देतात. दिवसभराच्या उस्तवारीने दमलेल्या बहुसंख्य लोकांसाठी ती कदाचित क्षणभराची करमणूक ठरत असू शकेल पण त्यांच्या एका क्लिकमुळे वेडेपणाची साथ पसरत जाते. असे काहीतरी केले म्हणजे माणसांना ते आवडते, असा भ्रम खोलवर मुरत चालला आहे.

YouTube video player

कारण त्यामुळे हा फक्त पसंतीचा खेळ राहत नाही. अशा बिनडोकांची दखल समाज माध्यमांवर घेतात. त्यांच्या मुलाखती घेतल्या जातात. त्यांचा वेडाचार पुन्हा पुन्हा दाखवला जातो. लाखो लोक ते बघतात आणि मग लोकांना हेच आवडते असे सर्वांना वाटू लागते आणि मग मेंढरं जशी एकामागोमाग चालतात तशी माणसे पुढच्याच्या पावलावर पाऊल टाकतात. आभासी जगात रमणे, समाज माध्यमांचे वाढते व्यसन, वाढती नकारात्मकता, वाढते मानसिक आणि शारीरिक अनारोग्य हे त्याचे भीषण परिणाम होतात. अर्थात समाज माध्यमांची अत्यंत सकारात्मक बाजूदेखील आहे. अनेक युवा सर्जनशील मजकूर टाकतात. भारताच्या संपन्न इतिहासाची ओळख करून देतात. काही युवा भारतातील मंदिरे कशी बघावीत हे शिकवतात. वैज्ञानिक दृष्टिकोन बळकट करतात.

सामाजिक शहाणपण वाढेल आणि ज्ञानात भर पडावी असाच त्यांचा प्रयत्न असतो. पण किती प्रेक्षक ते बघतात? अर्थात अशा युवांना त्यामुळे फारसा फरक पडत नाही हा भाग अलाहिदा. पण ही प्रेक्षकांची जबाबदारी नाही का? यातून बाहेर पडण्याची इच्छा असणार्‍यांसाठी तज्ज्ञ मार्ग सुचवतात. वेळेचे नियोजन करावे, समाज माध्यमांना किती वेळ द्यायचा हे ठरवून तसे अंमलात आणावे, या व्यासपीठावर ठरवून चांगली ओळख निर्माण करणे, वैयक्तिक गोष्टी न टाकणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शारीरिक आणि मानसिक आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य हे त्यापैकी काही. ते अंमलात आणण्यासाठी ज्याचे त्यालाच कष्ट घ्यावे लागतील.

मनोरंजन हा उद्देश जरूर असावा पण त्याची निदान ढोबळ व्याख्या निश्चित केली जाऊ शकेल का यावरही विचार व्हायला हवा. सगळे काही तज्ज्ञांच्या भरवशावर सोपवून पालकांना मोकळे होता येणार नाही. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थी मुलांच्या हातात काही वेळ मोबाईल सोपवला जाण्याचा हा काळ आहे. त्यामुळे त्याचा विवेकपूर्ण वापर शिकवणे, कधीतरी त्यांच्या मोबाईलवर शोध इतिहासाची सफर करून मुले नेमके काय बघतात हे जाणून घेणे ही पालकांचीच जबाबदारी आहे.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : “फक्त एक मत मला द्या, उरलेली...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik आगामी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) पार्श्वभूमीवर नवीन नाशकात (Nashik) प्रचाराला वेग आला असतानाच, काही इच्छुक उमेदवारांनी (Candidate) निवडलेली...