Friday, April 25, 2025
Homeसंपादकीयसंपादकीय : २७ फेब्रुवारी २०२५ - मराठी भाषा हीच संस्कृती

संपादकीय : २७ फेब्रुवारी २०२५ – मराठी भाषा हीच संस्कृती

आज 27 फेब्रुवारी. नाशिककर कविवर्य वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस. जो मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषा संवर्धनातील त्यांचे योगदान अमूल्य आहे. मराठी शिकण्याची भाषा व्हावी आणि बोलीभाषेला वेगळा साहित्य प्रकार म्हणून ओळख मिळावी यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. कालांतराने तिची दीनवाणी अवस्थाही कवितेच्याच माध्यमातून राज्याच्या कारभार्‍यांच्या नजरेस आणून दिली. मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित केले गेलेले ते दुसरे साहित्यिक. अशा या भाषेला आता अभिजात दर्जादेखील मिळाला आहे. तो निर्णय उत्साहात साजरादेखील केला गेला.

पण तिच्या संवर्धनाच्या पालखीचे भोई होण्याची आता मात्र खरी गरज आहे. पण तिच्याही बाबतीत ‘अति परिचयात अवज्ञा’ लोकांनी गृहीत धरली असू शकेल का? म्हणूनच किमान भाषा अचूक बोलणे लोक विसरले असावेत का? मोडतोड करून मराठी बोलली जाणे कोणालाही खटकत नसावे का? किंबहुना भावना पोहोचल्या ना.. असे म्हणून त्याचे समर्थनच होताना आढळते. ज्या दिवशी आईने बाळाला पहिली ओवी ऐकवली त्या दिवशी आमची मराठी जन्माला आली, असे साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष तारा भवाळकर म्हणतात. म्हणजे तेव्हापासून माणसाचा त्याची मातृभाषा मराठीचा परिचय होतो. शिक्षणाच्या माध्यमातून तो वाढत जातो, असे गृहीत धरले जाते.

- Advertisement -

शाळेत प्रमाणबद्ध भाषा शिकवली जाते. तरीही पुढे मराठी बोलताना ढिसाळपणा का वाढत जात असावा? भाषांचे आदानप्रदान सुरूच असते. जग जवळ आल्यावर तो प्रभाव वाढतच जाणार आहे. पण याचा अर्थ किमान मातृभाषा तरी अचूक बोलता न येणे असा होऊ शकतो का? मराठी मुलखातील लोकांकडून तेवढीही अपेक्षा नसावी का? इतर भाषांमधील शब्दांच्या उसनवारीची इतकी सवय झाली आहे की मराठी भाषेतील अचूक शब्दही लोकांना आठवेनासे होतात. म्हणूनच कदाचित अशुद्ध बोलीभाषा मोकळेपणाच्या नावाखाली चालवून घेण्याची सवय लोकांना जडलेली आढळते. त्याचे समर्थनही केले जाते. प्रौढीदेखील मिरवली जाते. मग त्याचा प्रभाव लेखनशैलीवर पडतो. माणसे सर्रास अशुद्ध लिहितात. तेही चालवून घेतले जाते. भाषेमुळे माणूस विचार करायला शिकतो. भावना व्यक्त करायला शिकतो. संस्कृती संवर्धन होते. ती आचरणातदेखील उतरते. म्हणूनच ‘भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही विझे दिवा’ असा इशारा कुसुमाग्रज देतात. भाषा-देश आणि संस्कृती यांचा परस्पर संबंध पुन्हा एकदा उलगडून सांगण्याची आवश्यकता आहे. ते एका दिवसाचे काम नाही.

मातृभाषेचा अभिमान माणसांनी बाळगायला हवा. पण तो पोकळ नसावा. मराठी भाषा ज्ञानभाषा, व्यवहाराची आणि उदरनिर्वाहाची भाषा होणे काळाची गरज आहे. ते काम करण्यासाठी सरकारवर दबाव आणणेही आवश्यक आहे. तथापि किमान अचूक भाषा बोलणे, तिचा अभिमान बाळगणे, ढिसाळपणा खपवून न घेणे, मुलांनी मराठी भाषा शिकण्याचा आग्रह धरणे आणि तसे त्यांना शिकवणे, किमान अचूक भाषेत बोलण्याचा आग्रह धरणे, मातृभाषेतून संवाद साधणे ही जबाबदारी मात्र मराठी मुलखातील सगळ्यांची आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...