Tuesday, November 19, 2024
Homeअग्रलेखसंपादकीय : २७ जुलै २०२४ - बीज अंकुरे पण कोणते?

संपादकीय : २७ जुलै २०२४ – बीज अंकुरे पण कोणते?

‘बीज अंकुरे अंकुरे.. ओल्या मातीच्या कुशीत’ अशी सध्याची परिस्थिती आहे. सृष्टीला तसा प्रतिसाद देण्यासाठी अनेक संस्था स्वयंस्फूर्त पुढाकार घेत आहेत. देवळा तालुक्यातील माळवाडी ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांनी गाव परिसरात सुमारे दोन हजार झाडे लावण्याचा संकल्प आणि त्या झाडांचे संवर्धन नियोजन जाहीर केले आहे.

नाशिक जिल्ह्यातील गंगाम्हाळुंगीच्या डोंगरावर ड्रोनच्या सहाय्याने बियांच्या चेंडूची पेरणी करण्यास सुरुवात झाली. शंभर हेक्टरवर हा उपक्रम राबवला जाणार आहे. वनविभाग, जिल्हा प्रशासन आणि भारत पेट्रोलियम हे त्यात सहभागी आहेत. एक कोटीहून अधिक झाडे लावण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने जाहीर केले आहे. वर्धा येथील निसर्ग सेवा समितीने रस्त्यांच्या कडेला वृक्षारोपण करण्यास सुरुवात केली आहे. दोन टेकड्याही हिरव्यागार केल्या आहेत. यासंदर्भातील वृत्त माध्यमांत प्रसिद्ध झाले आहे.

- Advertisement -

विविध प्रकारच्या प्रदूषणावर वृक्षारोपण आणि त्यांचे संवर्धन हा प्रमुख उपाय आहे. त्यामुळे वृक्षारोपण मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप येणे आवश्यक आहे. तथापि अशा मोहीम राबवताना ‘जे पेरले तेच उगवते’ हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. मन मानेल तशी आणि ती झाडे लावू नका असे आवाहन वृक्ष आणि निसर्गतज्ज्ञ वारंवार करतात. त्यामागचा उद्देश लोकांनी समजावून घ्यायला हवा. प्रत्येक ठिकाणची जैवविविधता वेगळी असू शकते. त्यानुसार स्थानिक वृक्षांचे विविध प्रकार आढळतात. पक्ष्यांचेही ते निवासस्थान असते. त्या- त्या प्रदेशात स्थानिक प्रकारचे वृक्ष लावले तर ते रुजण्याची शक्यता जास्त असते.

स्थानिक निसर्गानुसार स्थानिक प्रजातींच्या झाडांच्या बियांचे मातीचे चेंडू बनवले गेले तर ते अधिक फायद्याचे ठरू शकेल, असे तज्ज्ञ सांगतात. झाडे लावण्याचे महोत्सव होतात. लोकही त्यात सहभागी होतात. झाडे लावलीही जातात. छायाचित्रे प्रसिद्ध होतात. पण अनेकदा लोक उत्साह त्या पातळीवरच संपुष्टात येताना आढळतो. वृक्षारोपीत सगळीच झाडे जगतात का? तथापि जी जगतात त्यांचे योग्य संवर्धन झाले नाही तर तेही मातीमोल ठरण्याचा धोका असतोच. दरवर्षी जागतिक पर्यावरण दिवशी शेकडो-हजारो झाडे लावली जातात.

ते पाहता राज्यातील अनेक भागात झाडांचीच सावली लोकांनी अनुभवली नसती का? संवर्धनाचे नियोजन अमलात आणले तर काय घडू शकते याचे नाशिकमधील फाशीचा डोंगर, बोरगड परिसर हे चपखल उदाहरण ठरू शकेल. तेथील वनराजी फुलवून टिकवण्यासाठी लोकसहभागही मोलाचा ठरताना आढळतो. तात्पर्य वृक्षारोपण ही शास्त्रशुद्ध मोहीम आहे हे सर्वांनीच लक्षात घेण्याची गरज आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या