कोणत्याही सरकारी व्यवस्थांवर-सेवांवर सामान्यतः टीकाच केली जाते. विशेषतः सार्वजनिक आरोग्यसेवेचा उल्लेख केला तरी असंख्य तक्रारींचा पाऊस पडल्याचे अनेकदा आढळते. तथापि ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाचा एक उपक्रम या सेवेला मानवतेचा चेहरा प्रदान करणारा ठरावा. मनोरुग्ण महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी रुग्णालयात सौंदर्य प्रशिक्षण (ब्यूटीपार्लर) देण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत तीस महिलांनी त्याचा लाभ घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न केला आहे.
समाजाने साथ दिली तर हा उपक्रम मनोरुग्ण असलेल्या पण त्यातून बर्या झालेल्या महिलांना नवे आयुष्य बहाल करणारा ठरू शकेल. मनोविकार विविध प्रकारचे असतात. त्यांचाच स्वीकार समाजाने अजून केलेला नाही. मुळात मन आजारी पडू शकते आणि औषधांनी अशी माणसे बरी होतात, हेच अमान्य आहे. उपचार घ्यायची मानसिक तयारी अभावानेच दाखवली जाते. किंबहुना त्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांकडे जाणार्या व्यक्तीची संभावना सामान्यतः ‘वेडा’ अशी केली जाते. मनोरुग्णालयात दाखल होणार्या व्यक्तीकडे समाज कशा नजरेने बघू शकेल याचा अंदाज यावरून येऊ शकेल. म्हणूनच मनाचे आजार एकतर मान्य केले जात नाहीत किंवा जाहीररीत्या त्यावर चर्चाही घडत नाही.
परिणामी रुग्णालयात उपचार घेऊन बर्या झालेल्या व्यक्तीचा स्वीकार समाज लवकर करत नाही. त्यातही ती रुग्ण महिला असली तर तिच्या अडचणी तुलनेने जास्त असल्या तर नवल नाही. असे उपक्रम ती स्वीकारार्हता वाढवणारे ठरू शकतील. पुनर्वसन करण्याची क्षमता असल्याने बर्या झालेल्या व्यक्तींचा स्वीकार वाढू शकेल. मानसिक विकार आणि मनोरुग्ण असा शिक्का बसल्याने संबंधित व्यक्तीचा आत्मविश्वास खच्ची झालेला असतो. अशी माणसे सामाजिक स्तरावर मिसळत नाहीत. भीतीची भावना प्रबळ असते. कोणतीही कृती करण्याची उभारी संपुष्टात आलेली असते. रोजगार मिळू शकणारे प्रशिक्षण त्यांच्यात आत्मविश्वास पुन्हा भरू शकेल. त्याला समाजाचीही साथ अपेक्षित आहे.
रुग्णालय रुग्णाला बरे झाले म्हणून घरी पाठवते. समाजाने या निर्णयाचा आदर करण्याची खरी गरज आहे. प्रशिक्षित व्यक्तींकडून कौशल्यपूर्ण सेवांचा लाभ घेऊन लोक साथ देऊ शकतील. यातूनच मनोविकारांविषयी मोकळी चर्चा घडू शकेल. मनाचे आजारपण सुरुवातीच्या टप्प्यातच स्वीकारण्याची शक्यता निर्माण होऊ शकेल. कोणत्याही व्याधीची लक्षणे पहिल्या टप्प्यावरच लक्षात आली तर त्यातून बरे होण्याची शक्यता कैकपटींनी बळावते. मनोविकारही त्याला अपवाद नाहीत. रोजगारपूरक उपक्रम आत्मविश्वासाने आयुष्याला उभारी देऊ शकतील आणि त्यातूनच त्यांची स्वप्रतिमा चांगली होऊ शकेल. तेव्हा असे उपक्रम स्वागतार्ह आहेत.