दुर्दैवी वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे पुन्हा एकदा हुंडाबळीच्या घटनांना वाचा फुटली आहे. हगवणे प्रकरणाची राजकीय पार्श्वभूमी बाजूला ठेवली तरी घटनेचे गांभीर्य कमी होत नाही. अशा काही घटनांमध्ये पीडित महिलांनी आत्महत्या केली वा करण्याचा प्रयत्न केला किंवा सासरच्यांवर तिचा जीव घेण्याचा आरोप झाला म्हणून घटनांना किमान वाचा तरी फुटते. तथापि हुंड्यावरून आयुष्यभर मानसिक जाच सहन करणार्या महिलांची गणना देखील हुंडाबळी म्हणूनच केली जायला हवी.
या मुद्यावरुन सासरच्यांचे टोमणे आयुष्यभर मुकाट सहन करणार्या महिलांची संख्या लाखोंच्या घरात असू शकेल. हुंडा कुप्रथेला कायद्याने बंदी आहे. कायद्यात कठोर शिक्षेची तरतूद आहे. पण त्यामुळे हुंडा घेण्याच्या पद्धतीत बदल झाल्याचे आढळते. कायदा प्रभावी का ठरत नाही हा सरकारी पातळीवर संशोधनाचा विषय असायला हवा. पीडितांना न्याय मिळवून देणे आणि दोषींना शिक्षा ठोठावणे हे कायदेनिर्मितीचे मुख्य उद्देश असतात. ती सरकारची जबाबदारी आहे. कायद्याचा आधार घेत दोषींवर कारवाईची मागणी सर्वार्थाने समर्थनीय आहे. तथापि प्रकरण मुलगी बळी पडेपर्यंत जातेच कसे याचाही विचार व्हायला हवा.
हुंड्यावरून मुलीला तिच्या सासरी त्रास आहे याची जाणीव त्रास असणार्या बहुसंख्य मुलींच्या पालकांना असते. मुलीचा संसार मार्गी लागावा अशीच कोणत्याही पालकांची इच्छा असते. ती गैर नाही. पण म्हणून मुली करत असलेल्या छळाच्या तक्रारींकडे कुठपर्यंत दुर्लक्ष करायचे आणि तिला सहन करायला सांगायचे याला काही मर्यादा नसाव्यात का? काही मुली धाडस करून छळ नाकारून माहेरी येतात. पण त्यांना समजून सांगून परत सासरी पाठवण्याकडेच पालकांचा कल आढळतो. तुटेपर्यंत ताणू नये याचा पालकांना सोयीस्कर विसर पडणे देखील अयोग्यच.
कोणत्याही विपरीत प्रसंगांचा सामना करण्याची क्षमता मुलींमध्ये निर्माण करणे आणि त्या प्रत्येक टप्प्यावर तिला पाठबळ देणे तिच्या पालकांचे नैतिक कर्तव्य आहे. अर्थात, समाजात कासवाच्या गतीने का होईना पण बदलांची सुरुवात झालेली आढळते. अपवादाने का होईना पण हुंडा न घेता विवाह करणारे आढळू लागले आहेत. समाजातील अशा अनेक कुप्रथा नष्ट करण्यासाठी समाजसुधारकांनी कष्ट उपसले. त्या कुप्रथा नाकारल्या जाणे ही त्या बदलांना आलेली सकारात्मक फळेच आहेत. सुधारकी दृष्टिकोन स्वीकारणार्यांची संख्या वाढणे ही काळाची गरज आहे. या मुद्यावर समाजात जागरूकता निर्माण करण्याची नितांत गरज अशा घटना तीव्रतेने अधोरेखित करतात.