Tuesday, March 25, 2025
Homeअग्रलेखसंपादकीय : २८ जानेवारी २०२५ - माणूस जोडणार्‍या कार्याचा सन्मान

संपादकीय : २८ जानेवारी २०२५ – माणूस जोडणार्‍या कार्याचा सन्मान

भारताचा प्रजासत्ताक दिन नुकताच साजरा झाला. यानिमित्त देशातील अनेक मान्यवरांना ‘पद्म’ आणि ‘पद्मश्री’पुरस्कार जाहीर झाले. त्यात महाराष्ट्रातील अनेक महान व्यक्तिमत्त्वांचाही समावेश आहे. देशातील हे नागरी पुरस्कार प्रतिष्ठेचे मानले जातात. ज्यांना हा सन्मान मिळाला, त्यांचे कार्य जगावेगळे आहे. सामाजिक बांधिलकीला, कलेला दृगोचर करणारे आणि उद्योग-व्यवसायांना मानवी चेहरा देणारे आहे. तथापि ती माणसे इतरांसारखीच सामान्य आहेत किंवा कधीकाळी होती, असे म्हणता येईल.

पुरस्कार जाहीर झाल्यावर पुरस्कारार्थींनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया बोलक्या आहेत. ‘विद्या विनयेन शोभते’ हा सुविचार आचरणार्‍या आहेत. नम्रता हा त्यातील एक समान धागा आहे. प्रत्येकाचे क्षेत्र वेगळे आहे. तथापि त्या क्षेत्रात कार्य करण्यामागचा त्यांचा उद्देश मात्र सामाजिक असल्याचे दिसते. आयुष्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन, त्यांनी ठरवलेले ध्येय, त्याच्या पूर्तीसाठी त्यांचे प्रयत्नातील सातत्य, समर्पण, विलक्षण ध्येयनिष्ठा, हार न मानण्याची विजिगिषू वृत्ती, विचार आणि आचरणातील प्रामाणिकता, सकारात्मकता, वचनबद्धता आणि समाजाविषयीचा कळवळा ही मूल्ये त्यांचे काम व त्यांना इतरांपेक्षा वेगळे ठरवतात.

- Advertisement -

ही मूल्ये सर्वांनी शिकण्यासारखीच आहेत. सर्वांच्याच कार्याला किमान चाळीस-पन्नास वर्षे झाली असतील. त्यांनी काम सुरु केले तो काळ आधुनिक नव्हता. तथापि कारणे न सांगण्याची, दोष न देण्याची आणि बहाणेबाजी न करण्याची त्यांची वृत्तीदेखील अनुसरण्यासारखी आहे. त्यापैकी एक आहेत मारुती चितमपल्ली! ‘वनकोश’ असे त्यांचे वर्णन करता येईल. वनांची समृद्धता आणि महत्व माणसांच्या लक्षात आणून देण्यासाठी त्यांनी असंख्य जंगले पायाखाली घातली. 25 पुस्तके लिहिली. प्राणिकोश, वृक्षकोश, मत्स्यकोश जन्माला घातले. आजही ते नेटाने कार्यरत आहेत.

डॉ. विलास डांगरे गेली पन्नास वर्षे अत्यल्प मूल्य घेऊन गरजू रुग्णांवर उपचार करतात. डॉक्टरांना प्रशिक्षण देतात. दहा वर्षांपूर्वी त्यांची दृष्टी गेली, पण म्हणून त्यांचे काम थांबलेले नाही. चैत्राम पवार यांनी सुखासीनतेची नोकरी नाकारली आणि त्यांच्या बारीपाडा गावातच ठाण मांडले. गाव ‘आदर्श’ बनवले. कैक एकरावर जंगल फुलवले. स्थानिक जैवविविधतेला पूरक उद्योग फुलवले.

स्वावलंबी व समृद्धशाली गावाच्या निर्मितीतून गावांतील माणसांचे शहरांकडे होणारे स्थलांतर थांबवण्यात त्यांना यश आले. हे काही उल्लेखनीय उद्देश आणि कार्य! उर्वरित सर्वांचे कार्य असेच महान आहे. त्यांचा परिचय छोटा वाटला तरी त्यामागे त्यांचे वर्षानुवर्षांचे अविरत कष्ट आहेत. अशा रचनात्मक कार्यातून माणूस जोडला जातो. समृद्ध होतो. त्याचाच हा सन्मान आहे. पुरस्कारार्थींचे कार्य नक्कीच प्रेरणादायी आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...