Friday, March 28, 2025
Homeसंपादकीयसंपादकीय : २८ मार्च २०२५ - सामर्थ्याचे बळ

संपादकीय : २८ मार्च २०२५ – सामर्थ्याचे बळ

निश्चयाचे बळ अंगी असेल तर अशा व्यक्तीचा स्वतःकडे आणि समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. समाजाला चमत्कार वाटू शकेल अशी कामे अशी व्यक्ती करू शकते. ‘निश्चयाचे बळ, तेचि फळ’ असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे याची प्रचिती एका महिलेने समाजाला आणून दिली. तिच्या प्रयत्नांनी जातपंचायत भरू शकली नाही. ही घटना अहिल्यानगर जिल्ह्यात मढी येथे नुकतीच घडली. तिने घेतलेला पुढाकार आणि पोलिसांचे सहकार्य यामुळे पीडित व्यक्तींची जातपंचायतीच्या दहशतीपासून मुक्तता होऊ शकली. ती महिला कार्यकर्ती होती. त्यामुळे सजगही होती. पण लढण्याचे बळ तिचे तिलाच कमवावे लागले असणार.

समाजात विशेषतः महिला असंख्य अडचणींचा सामना करतात. समाजरचनेतील त्यांच्या वाट्याला आलेले दुय्यमत्व त्यात अजूनच भर घालणारे ठरते. पण निर्धार केला तर परिस्थितीत बदल घडवला जाऊ शकतो हे उपरोक्त घटनेतील महिलेने कृतीतून दाखवले आहे. निर्धार आणि निश्चय व्यक्तीला सामर्थ्य मिळवून देतो. त्याच्या बळावर सकारात्मक बदल घडवले जाऊ शकतात आणि अन्यायाला विरोध केला जाऊ शकतो याची जाणीव संबंधित व्यक्तीला होऊ शकते. ती जाणीवच महत्वाची असते. बदलाचे आणि स्वयंप्रेरणेचे ते पहिले पाऊल मानले जाते. मग ते बदल वैयक्तिक आयुष्यात, सामाजिक जीवनात, व्यावसायिक स्तरावर किंवा जिथे आवश्यकता भासेल त्या स्तरावर केले जाऊ शकतील.

- Advertisement -

विचार, संस्कार, विश्वास प्रणाली, मूल्यव्यवस्था, उत्तम वाचन सवयी आणि स्वप्रतिमा हे सामर्थ्य मिळवण्याचे महत्वाचे घटक मानले जातात. त्याद्वारे महिला सामर्थ्य अंगी बनवू शकतील. विचारांच्या मंथनातून मिळालेल्या अशा सामर्थ्याला विवेकाचे अधिष्ठान प्राप्त होते. परिणामी त्या सामर्थ्याचा उपयोग कोठे आणि कसा करावा याचा साकल्याने विचार करण्याची ताकद अशी व्यक्ती राखून असते. विवेक असलेली अशी व्यक्ती छोटे छोटे बदल करून पाहायला प्रवृत्त होते.

जशी अहिल्यानगरमधील महिलेने तिच्या एकटीच्या बळावर जातपंचायत भरू दिली नाही. सर्वानाच तिच्यासारखी समाजसेवा करणे शक्य होईलच असे नाही. पण सामान्य महिला त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात बदल घडवू शकतील. वैचारिक बैठक पक्की झाली की वितंडवाद घालण्याची आणि अभिनिवेशाची आवश्यकता नसते हेही कदाचित महिलांच्या लक्षात येऊ शकेल. इतके सगळे बदल सामर्थ्य आणि निर्धार घडवू शकेल. पण सामर्थ्याचे बळ कमावण्यासाठी महिलांनाच सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याची गरज आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

सुपा उद्योगनगरी 5 वर्षांत वेगाने विस्तारणार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar सुपा-नगरसह जिल्ह्यातील उद्योग नगरींचा विकास आतापर्यंत पूर्ण क्षमेतेने होणे अपेक्षीत होते. त्यासाठी सर्वांनाच प्रयत्न वाढवावे लागतील. या भागात तंत्रज्ञान विकास आणि उद्योग...