हवामान बदल आणि प्रदूषणाचा कहर आहे. नक्की कोणता ऋतू सुरू आहे हे कदाचित कोणीच सांगू शकणार नाही. या मुद्यावर अगदी निसर्गसुद्धा गोंधळून जावा अशीच सद्यस्थिती आहे. उष्णतेच्या कडाक्याचे लोकांचे आश्चर्य ओसरत नाही तोच थंडी पडली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान दहा अंशाच्या खाली नोंदवले गेल्याचे वृत्त आहे. यापुढेही काही दिवस तापमानात चढ-उतार जाणवू शकतील आणि थंडीची तीव्रता वाढू शकेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
मुंबईतील सांताक्रूझ येथे गेल्या आठ वर्षांतील सर्वात नीचांकी तापमान नोंदवले गेल्याचे सांगितले जाते. सांगायचा मुद्दा म्हणजे हवामान विलक्षण लहरी होत आहे. दिल्लीसारख्या राज्यांमध्ये प्रदूषण त्याच्या चरणसीमेवर आहे. परिस्थिती काळजी करावी अशीच आहे. जागतिक आणि देशपातळीवर तशी ती सुरू असल्याचे आढळते. जागतिक परिषदा पार पडतात. हवामानाशी जुळवून घेतील आणि अनुकूल ठरू शकतील अशा सुधारित बियाणांच्या जाती पंतप्रधानांनी देशाला अर्पण केल्या. हे त्या प्रयत्नांचाच एक भाग आहेत.
निसर्गलहरींचे विपरीत परिणाम सामान्य माणसांनाच जास्त सहन करावे लागतात. गंमत म्हणजे हवामान बदल ही जागतिक समस्या आहे. त्याची उत्तरे जागतिक स्तरावर शोधली जायला हवीत. सामान्य माणसांचा त्याच्याशी थेट काहीच संबंध नाही अशी भावना याच सामान्य माणसांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते. तथापि सामान्य माणसेही त्यांच्या स्तरावर काम करू शकतात आणि त्यांचा खारीचा वाटा उचलू शकतात हे दर्शवणारे प्रयोग अवतीभोवती सुरू असल्याचे आढळते. असाच एक प्रयोग पुणे पौडजवळ मांदोडे गावात सुरू आहे. त्याची यशोगाथा माध्यमांत प्रसिद्ध झाली आहे.
एक सामाजिक संस्था आणि लोकसहभागाने दीड वर्षांपूर्वी हा प्रयोग सुरू झाला. गावातील पन्नास टक्के घरांमध्ये स्वयंपाकासाठी प्रदूषविरहित चुली बसवण्यात आल्या आहेत. त्यामुळे धुराच्या उत्सर्जनात घट होणे स्वाभाविकच. 10 टक्के घरांवर सौर पॅनल बसवले गेले आहेत. तीन साखळी बंधार्यांमधील गाळ काढणे सुरू आहे. सांडपाणी प्रक्रिया आणि पाण्याचा पुनर्वापर प्रकल्प सुरू आहे.
तात्पर्य, ‘गाव करी ते राव काय करी’ या उक्तीचा अनुभव गावकरी घेत असू शकतील. हे प्रयत्न प्रायोगिक स्तरावर आहेत. त्याचे ठाम निष्कर्ष काढण्याची घाई कदाचित केली जाणार नाही. केवळ हाच नव्हे तर असे प्रयोग किती काळ सुरू राहतात किंवा राहू शकतात याविषयी दुमत असू शकेल. तथापि निसर्गलहरींवर सामान्य माणसे त्यांच्यापरीने मार्ग काढू शकतात. सामूहिक फायद्यासाठी लोक एकत्र येऊ शकतात. ‘व्यक्ती ते समष्टी’ असा प्रवास करू शकतात अशा आशा असे प्रयोग पल्लवित करतात, हेही नसे थोडके.