केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत. या परीक्षेची काठिण्य पातळी परीक्षार्थींची कसोटी बघणारी असते. त्यात उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या यशकथा माध्यमांत प्रसिद्ध होत आहेत. यश कसे मिळवले? अभ्यास कसा केला? सकारात्मकता कशी राखली? याविषयी त्यात प्राधान्याने लिहिले जात आहे. त्यातील मेंढपाळ बिरदेव डोणे हे नाव विशेष चर्चेत आहे.
वडील मेंढपाळ, घरात कोणत्याही प्रकारचे वातावरण आणि मार्गदर्शन नव्हते. या परीक्षेत दोनदा अपयश पदरी पडले. तरीही त्याने हार मानली नाही. अगदी निकाल लागला तेव्हाही तो मेंढ्या राखायला गेला होता. गार्गी लोंढे हिने समाज माध्यमांपासून सुमारे दोन वर्षे स्वतःला पूर्णपणे दूर ठेवले होते. प्रतिकूल परिस्थिती, वातावरणाचा अभाव किंवा ध्येय निश्चितीच्या काळात योग्य मार्गदर्शनाचा अभाव याचा कोणीही बाऊ केलेला किंवा उल्लेखनीय यश मिळवल्यानंतरही भावना प्रगटीकरण करताना कोणीही त्याचा आव आणलेला आढळला नाही.
सहज विचारल्या गेलेल्या प्रश्नांच्या उत्तरातून त्यांचे प्रयत्न जगाला समजले. ते विलक्षण प्रेरणादायी तर आहेतच पण विचारांना दिशादर्शकदेखील आहेत. ‘मला हे शक्य आहे’ हे त्यांच्या सर्वांच्या भावनांचे सार आहे. जे सामान्य माणसे विविध पातळ्यांवर अंमलात आणू शकतील. अनेक युवांची वेगवेगळी स्वप्ने असतात. अनेकांना त्याचा पाठलाग करणे शक्य होत नाही. त्याचा दोष सामान्यतः परिस्थितीला दिला जाताना दिसतो. अनेक कारणे सांगितली जातात. व्यक्तिपरत्वे ती खरी असूही शकतील. पण न झालेल्या कामासाठी कारणे सांगण्याची सवय घातक ठरत असावी का? निर्धार, कठोर मेहनत आणि उणिवांवर मात करण्याचे जीवतोड प्रयत्नही कमी पडत असू शकतील का? अनेकदा सामान्य माणसांची परिस्थितीही विपरीत असते.
दीर्घ व्याधी जडलेल्या असतात. बेरोजगारी सतावते. काहींच्या बाबतीत नातेसंबंधातील तणाव टोकाला गेलेले असतात. आर्थिक परिस्थिती विपरीत असते. काहींच्या वाट्याला अपंगत्व आलेले असते. अनेक विद्यार्थ्यांना मनासारखे गुण पडत नाहीत. ही परिस्थिती ज्याच्या-त्याच्यासाठी निराशा उत्पन्न करणारी असते. तथापि परिस्थितीचा स्वीकार केला तर त्यावर मात करण्याचे मार्ग सापडू शकतात हे उपरोक्त यशस्वी युवांनी अधोरेखित केले आहे. अशा परीक्षांचा विचार करणारे युवा समजूतदार वयाचे असतात. युवांनी त्यांच्या अंगभूत क्षमतांचा विचार करूनच स्वप्ने बघावीत अशी पालकांची अपेक्षा असते. ती रास्त म्हटली जाऊ शकेल. तात्पर्य, ‘जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाया..जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया..मज काय शक्य आहे अशक्य काय आहे.. माझे मला कळाया दे बुद्धी देवराया’ हेच खरे.