Tuesday, January 27, 2026
Homeअग्रलेखसंपादकीय : २९ ऑगस्ट २०२४ - नको रे मना लोभ हा अंगिकारू..

संपादकीय : २९ ऑगस्ट २०२४ – नको रे मना लोभ हा अंगिकारू..

ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. नंदुरबार आणि पुण्यात नुकतीच अशी घटना उघडकीस आली. दोन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी लोकांना सुमारे पन्नास लाखांचा गंडा घातला. असे कोट्यवधी लुटल्याचे गुन्हे सातत्याने घडतात. यासंदर्भात लोकांना साक्षर करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सरकार आणि अनेक सामाजिक संस्था करतात. तरीही माणसे सहज ऑनलाईन दरोडेखोरांच्या तावडीत सापडतात.

लोक असे फसतात कसे? कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. ओटीपी कोणाला सांगू नका. फोनवर तुमच्या खात्यासंदर्भात बँका वैयक्तिक चौकशी करत नाही, त्यामुळे अशी चौकशी करू पाहणार्‍यांना माहिती देऊ नका. शक्य असेल तर अनोळखी क्रमांकावरून आलेले कॉल उचलू नका. तुमच्या आर्थिक गुंतवणुकीची माहिती कोणाला सांगू नका. अशा अनेक सूचना प्रशासन सातत्याने देते. तसेच पैशाचा पाऊस कधीही पडत नाही आणि कोणालाही पाडता येत नाही. तरीही लोक अशा अफवांना फसतातच. शिवाय अशी फसवणूक झाल्यावर तक्रार कुठे करावी? कशी करावी याचेही ज्ञान किती जणांना असते? बहुसंख्यांना नसतेच.

- Advertisement -

कोणत्याही आर्थिक योजना गुंतवणूकदारांच्या लाभाच्या असतात. लाभ नेहमीच मर्यादित स्वरुपाचा असतो, असे तज्ज्ञ सांगतात. पण लोक जास्तीच्या परताव्याच्या लोभात अडकत असावेत का? लाभ आणि लोभ या दोन शब्दात फक्त एका मात्रेचा फरक असतो. तो जे लक्षात घेत नाहीत ते मोहात अडकतात. दामदुप्पट करून देणार्‍या आणि जास्त टक्के व्याज देण्याचे आश्वासन देणार्‍या योजनांच्या मोहात पडतात आणि कष्टाची कमाई गमावतात.

YouTube video player

लोभ या शब्दातच फसवणूक अंतर्भूत असावी का? अन्यथा दामदुप्पट कोण करून देते? आरबीआयने नेमून दिलेल्या नियमांपेक्षा जास्त परतावा कोण देऊ शकेल? एका क्लिकसरशी पैसे गेले की लोकांना धक्का बसतो. पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. स्वकष्टार्जित कमाईचे महत्त्व अनेक संतांनी सांगून ठेवले आहे.

अशीच लक्ष्मी स्थिरावते आणि कुटुंबाला समाधान देणे असा उपदेश संत एकनाथ महाराजांनी केला आहे. ‘नकोरे मना द्रव्य ते पूढिलांचे । अति स्वार्थबुद्धीन रे पाप सांचें ।’ असे समर्थ रामदास स्वामींनी सांगितले आहे. दुर्दैवाने असे उपदेश कानामागे टाकणार्‍या लोकांची संख्या वाढत असावी का? तात्पर्य, कायद्याच्या चौकटीत राहून लोभ नव्हे तर आर्थिक लाभ मिळवणेच लोकांच्या हिताचे आहे असेच त्यांना सुचवायचे असावे.

ताज्या बातम्या

Pradhan Mantri Awas Yojana : आता खऱ्या गरजूंनाच मिळणार घर! प्रधानमंत्री...

0
दिल्ली । Delhi केंद्र सरकारने शहरी भागातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या 'प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.०' अंतर्गत नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. या नव्या मार्गदर्शक...