वसुंधरेच्या जीवसृष्टीतील झाडांचे महत्त्व सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा मानवी मनावर ठसवण्याचा प्रयत्न केला आहे. झाडे तोडणे मानवी हत्येपेक्षाही गंभीर आहे अशी टिप्पणी केली आहे. माणसाच्या श्वासाशी झाडाची तुलना करून झाडे जगली तर माणूस जगेल, असे न्यायालयाने सुचवले आहे. एका व्यक्तीने सुमारे चारशेपेक्षा झाडे तोडली. त्या मुद्यावर सुनावणी झाली.
संबंधित व्यक्तीला न्यायालयाने प्रत्येक झाडासाठी एक लाख रुपये दंड ठोठावला आहे. झाडे तोडणार्या व्यक्तीने माफी मागितली पण न्यायालयाने ती नाकारली अशा माफीची संभावना ‘बैल गेला आणि झोपा केल्या’अशीच होऊ शकेल. याबाबतीत बहुसंख्य माणसांचीही अवस्था फारशी वेगळी नसू शकेल का? अन्यथा, हजारोंनी झाडे लावली आणि मुख्य म्हणजे जगवली गेली नसती का? नाही म्हणायला, कोणत्या तरी निमित्ताने अनेक जण वृक्षारोपण करतात. मोहिमा राबवतात. पण याबाबतीतही आरंभशुरता अनुभवास येते असे वसुंधरा कार्यकर्त्यांचे निरीक्षण आहे. म्हणजे, झाडे लावली तर जातात पण त्यांच्या संवर्धनाबाबत फारशी जागरूकता आढळत नाही.
रोपणानंतर किमान सुरुवातीची पाच-सात वर्षे तरी झाडांची काळजी घ्यावी लागते. त्यानंतर ते निसर्गात सामावून जाते असे कार्यकर्ते सांगतात. एक देशी झाड म्हणजे परिसंस्थाच असते. उदाहरणार्थ, वडाचे झाड. माणसाच्या कित्येक पिढ्या एका झाडाच्या साक्षीदार बनतात एवढे ते दीर्घायुषी असते. एक वड असंख्य जीवांना आसरा देतो. ज्यांचे जैविविधतेत अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच न्यायालयाने दंडाची रकमही कमी करण्यास नकार दिला आणि जेवढी झाडे तोडली तेवढी लावण्याचेही आदेश दिले.
सामान्य माणसेही त्यांच्या परीने निसर्गसाखळीचा एक भाग होऊ शकतील. झाडे लावून ती जगवू शकतील. नाशिकचा विचार केला तर अजूनही अनेक भागात जुने वृक्ष आहेत. त्यांची नोंद माणसे ठेवू शकतील. जिथे झाडे तोडली जाताना दिसतील तिथे प्रश्न विचारू शकतील. आक्षेप घेऊ शकतील. ते नाहीच जमले तर ती बाब निदान सामाजिक कार्यकर्त्यांच्या लक्षात आणून देऊ शकतील. समाजमाध्यमांद्वारे वृक्षतोड लाखोंच्या नजरेला आणून देऊ शकतील.
‘वल्लींमध्ये जीवन। नाना फळीफुली जीवन। नाना कंदी मुळी जीवन। गुणकारके॥’असे वर्णन समर्थ रामदास स्वामी करतात तर संत तुकाराम महाराजांनी झाडांना माणसाचे सगेसोयरे म्हटले आहे. माणसाचे अस्तित्व टिकवण्याचे काम झाडे वर्षानुवर्षे करतच आली आहेत, गरज आहे ती माणसाने खर्या अर्थाने वृक्षमित्र बनण्याची. तेच न्यायालयाने वेगळ्या शब्दात सुचवले आहे.