वर्षांखालील मुलांना समाज माध्यमे वापरायला बंदी घालणारा ऑस्ट्रेलिया हा जगातील पहिला देश ठरला आहे. तशा अर्थाचे विधेयक ऑस्ट्रेलिया सिनेटने नुकतेच संमत केले. बंदी मोडल्यास संबंधितांना जबर आर्थिक दंडाची तरतूददेखील केली जाणार असल्याचे माध्यमांत जाहीर केले गेले आहे. बंदीची अंमलबजावणी करण्यास विविध समाज माध्यमांच्या व्यासपीठांना एक वर्षाचा कालावधी देण्यात आला आहे. यावर जगभरातील माध्यमांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
बंदी यशस्वी होईल का? पळवाट काढली जाऊ शकेल का? मुले पालकांच्या नावाने खाते उघडतील का? समाज माध्यमांवर खाते उघडणार्याचे वय कसे तपासणार? याआधी अशी बंदी घालण्याचा प्रयत्न फेसबुकने केला होता. तो अयशस्वी का ठरला? मुलांना तंत्रज्ञानापासून दूर ठेवणे योग्य आहे का? ते शक्य आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यापुढेही केले जात राहतील. पण एक मात्र खरे की, अशी बंदी घालावी अशी बहुसंख्य पालकांची भावना असू शकेल. या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा, अशी बंदी घालण्याची वेळ का आली? त्याचा विचार प्राधान्याने केला जायला हवा. समाज माध्यमांचा उदय झाला तेव्हा लोकशिक्षणात क्रांती घडेल, अशी जाणत्यांची अपेक्षा होती. पण ती काही प्रमाणात फोल ठरली हे मान्यच करावे लागेल.
या माध्यमांची काळी बाजूच प्रभावशाली ठरताना दिसते. विशेषतः अडनिड्या वयाच्या मुलांच्या मनावर याचे होत असलेले दुष्परिणाम जगभरातील जाणत्यांच्या चिंतेचा विषय आहे. कारण चुकीच्या वापराचा अतिरेक आढळतो. वास्तविक हे वय स्वप्नात रमण्याचे, शारीरिक आणि मानसिकता, भावभावनांचा परिचय होण्याचे मानले जाते. तथापि त्याच वयात मुलांच्या मनावर हिंसेचा, द्वेषाचा, जीवघेण्या स्पर्धेचा, हेकेखोरपणाचा पगडा आढळतो. शाळकरी मुले सहज त्यांच्या मित्राचा खून करतात. त्यांच्या दप्तरात हत्यारे सापडतात. त्याची कारणेही अत्यंत क्षुल्लक आढळतात. त्यांना पडणार्या प्रश्नांची उत्तरे चुकीच्या पद्धतीने मिळतात.
समाज माध्यमांवरील मजकूर आणि वेगवेगळे हिंसक खेळ हे याची बीजे रोवण्याचे एक प्रमुख कारण मानले जाते. बंदी ऑस्ट्रेलियापुरती मर्यादित असली तरी दुष्परिणामांना मात्र जागतिक स्तरावरील पालक सामोरे जात आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरू नये. मुलांचे बालपण हरवत चालले होते असे ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी म्हटले आहे. ते नाकारले जाऊ शकेल का? मुलांचे वयानुसार फुलणारे भावनिक विश्व उद्ध्वस्त करण्याचे एक कारण ठरू शकणार्या समस्येवर ऑस्ट्रलिया सरकारने त्यांच्या परीने मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे.
तथापि या समस्येचे ज्याने त्याने त्याच्या पातळीवर याचे चिंतन करण्याची आवश्यकता आहे. त्यातून कदाचित त्यांना नवे मार्ग सापडू शकतील. तंत्रज्ञानाचा विकास थांबणार नाही. तथापि त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी विविध प्रयोग करत राहणे आणि त्यातून शिकत राहणे हाच सध्याचा व्यवहार्य उपाय ठरू शकेल.