एकशे दोन वर्षांची परंपरा लाभलेल्या नाशिक वसंत व्याख्यानमालेला गोदाकाठी कालपासून सुरुवात झाली. ही व्याख्यानमाला नाशिककरांचे पिढ्यान-पिढ्या बौद्धिक पोषण करीत आहे. यानिमित्ताने जागतिक कीर्तीचे व्याख्याते नाशिकला येतात. त्यांचे विचार नाशिककरांना ऐकायला मिळतात. संगीताची मेजवानी रसिकांचे कान तृप्त करते. गोदा आणि रामकुंड परिसर नाशिककरांसाठी हक्काचा परिसर आहे. पन्नाशीला आलेले नाशिककर या परिसराला भेट देतात तेव्हा त्यांच्या मनःपटलावर अनेक आठवणी पिंगा घालत असतील.
गोदाकाठचा परिसर नाशिककरांसाठी नेहमीच ऊर्जास्रोत राहिला आहे. लेखक आणि कवींना हा परिसर नेहमीच खुणावतो. चित्रकारांच्या कलेला इथेच धुमारे फुटतात. नाशिकमध्ये वेगवेगळ्या निमित्ताने निघणार्या बहुसंख्य सार्वजनिक व धार्मिक मिरवणुका येथेच येऊन समाप्त होतात. त्याअर्थाने गोदाघाट सर्वसमावेशकतेचे अनोखे उदाहरण ठरू शकेल. विविध प्रकारच्या रोजगार निर्मितीला कारण ठरल्याने नाशिककर गोदावरीला त्यांची मजीवनदायिनीफच मानतात. अशी ही गोदावरी आणखी किती दिवस फक्त कागदावरच प्रदूषणमुक्त होत राहणार? किती दिवस ती फक्त डॉ. राजेंद्रसिह यांच्यासारख्या जाणत्यांच्या स्वप्नात बारमाही वाहत राहणार?
किती दिवस तिच्या पाण्यात मनसोक्त डुंबण्यासाठी पाण्याचे आवर्तन सुटण्याची वाट युवा पिढी पाहणार? गोदा प्रवाही, स्वच्छ आणि सुंदर करण्याची आश्वासने राज्याचे कारभारी आणखी किती दिवस देत राहतील? त्यासाठी तिच्या पात्रात ठिकठिकाणी मिसळणारे सांडपाणी आधी बंद करावे लागेल. तिच्या पात्रातील काँक्रिटीकरण काढावे लागेल. तिचा काठ दुतर्फा सर्व प्रकारच्या अतिक्रमणांपासून मुक्त करावा लागेल. तिचे पात्र प्रदूषित करण्यास हातभार लावणार्यांवर सातत्याने कडक कारवाई करावी लागेल. याबाबत स्पष्ट आदेश न्यायसंस्थेने वारंवार दिले आहेत. त्यांच्या अंमलबजावणीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनीही कोर्टाची पायरी अनेकदा चढली आहे.
कोणतीही नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी फक्त अभियान किंवा प्रकल्प घोषित करणे पुरेसे नाही. त्यासाठी प्रदूषणाच्या मुळाशी जाऊन काम करावे लागेल, असे मत डॉ. माधवराव गाडगीळ यांनी व्यक्त केले आहे. जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिहदेखील सातत्याने मार्गदर्शन करतात. या पार्श्ववभूमीवर आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिककर ‘नमामि गोदा’च्या प्रतीक्षेत आहेत. गोदावरी नदी प्रदूषणमुक्त होण्यात महत्वाची भूमिका बजावणार्या मलनिःस्सारण केंद्रांची उभारणी, गोदाघाटांचे नूतनीकरण व सौंदर्यीकरण, कचरा व्यवस्थापनासाठी आधुनिक प्रणालींची उभारणी आणि सिंहस्थात भाविकांसाठी स्वच्छ पाणी सुविधा देणे हे त्या प्रकल्पाचे उद्देश आहेत. गोदावरीला तिचे वैभव पुन्हा मिळवून देणार्या ‘नमामि गोदा’ प्रकल्पाची कार्यक्षमतेने अंमलबजावणी सिंहस्थापूर्वी व्हावी, हीच नाशिककरांची अपेक्षा आहे.