सर्व प्रकारचे प्रदूषण वाढत आहे. त्याला आळा घालण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न केला जात असल्याचे सरकारकडून वेळोवेळी सांगितले जाते. तथापि असे प्रयत्न लोकांच्या इच्छाशक्तीशिवाय प्रभावी ठरू शकत नाहीत, असे निरीक्षण न्यायसंस्थेने नोंदवले आहे. पीओपी गणेशमूर्तींच्या वापराबाबत उच्च न्यायालयासमोर अनेक जनहित याचिका दाखल होतात. त्यांची एकत्रित सुनावणी सुरु आहे. त्यावेळी न्यायालयाने वर उल्लेखित टिप्पणी केली आहे.
माघ महिन्यापासून पीओपी गणेशमूर्तींचा मुद्दा चर्चेत आहे. त्यावेळी अनेक मंडळांनी पीओपी मूर्ती विराजमान केल्या होत्या. त्यांचे विसर्जन थेट जलपात्रात करण्यास न्यायालयाने परवानगी नाकारली होती. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या यासंदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेशही स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले होते. न्यायालय पीओपी मूर्तींवरील बंदीबाबत आदेश देत राहील. तथापि जनतेची इच्छाशक्तीच न्यायालयाने घातलेली बंदी सार्थ ठरवू शकेल, असे न्यायमूर्तींनी म्हटल्याची बातमीही माध्यमात प्रसिद्ध झाली आहे.
या टिपण्णीतील मतितार्थ लोकांनी गंभीरपणे घ्यायला हवा. माती-जल-वायू या तिन्ही पातळ्यांवर प्रदूषण वाढत आहे. त्याचे थेट परिणाम सामान्य माणसांनाच भोगावे लागतात. सध्याचेच तापमानवाढीचे उदाहरण लक्षात घेण्यासारखे आहे. बहुतेक ठिकाणी तापमानाचा पारा दररोज चाळीशी ओलांडत आहे. तरीही रोजीरोटीसाठी बहुसंख्य माणसांना घर सोडावेच लागते. ऊन डोक्यावर घ्यावेच लागते. मग त्याचे परिणाम माणसांना सहन करावे लागतात. उन्हाचे कारण सांगून माणसे घरी बसून राहू शकत नाहीत. अनेक ठिकाणी पाणीटंचाईची चाहूल लागली आहे.
माणसे करीत असलेली पाण्याची उधळपट्टी त्यात भर घालते. पीओपी पाण्यात विरघळत नाही. परिणामी मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण होते. जलचरांसाठी ते धोकादायक आहे. ही सगळी माहिती लोक जाणून असतात. पण माहितीचे ज्ञानात आणि आचरणात रूपांतर होत नाही हीच खरी समस्या आहे. न्यायालयानेही तेच निरीक्षण नोंदवले आहे. माणसांच्या सवयी आणि काहीशी बेफिकिरवृत्ती कळत-नकळत प्रदूषणास कारणीभूत ठरते.
झाडे तापमानवाढ कमी करतात हे सर्वांना ठाऊक आहे, पण किती जण वृक्षारोपण चळवळीत भाग घेतात? किती जण स्वतः झाडे लावतात? आणि इतरांनाही प्रेरणा देतात? एकदा वापरून फेकून दिले जाणारे प्लास्टिक माती आणि जलप्रदूषण करते. त्याच्या वापरावर बंदी आहे. ती किती लोक पाळतात? तात्पर्य, सरकारी प्रयत्नांचे आणि आवाहनाचे अपेक्षित परिणाम दिसण्यासाठी लोकांची साथ मिळणे आवश्यक आहे.