Sunday, November 24, 2024
Homeअग्रलेखसंपादकीय : ३० ऑगस्ट २०२४ - तू चल तेरे वजूद की.. समय...

संपादकीय : ३० ऑगस्ट २०२४ – तू चल तेरे वजूद की.. समय को भी तलाश है

पॅरिसमध्ये पॅरालिम्पिक सुरू झाले. भारताचे आजवरचे सर्वात मोठे पथक या स्पर्धेत उतरले आहे. 180 देश यात सहभागी झाले आहेत. संघ कोणत्याही देशाचा असो, खेळाच्या या महाकुंभात सहभागी झालेल्या प्रत्येक खेळाडूचा प्रवास थक्क करणारा आहे. परिस्थिती अनुकूल नाही असे रडगाणे गाणार्‍या रडतराऊंना आव्हानांचा सामना करण्याची प्रेरणा देणारा आहे. प्रत्येकाने शारीरिक व्यंगावर आणि त्यामुळे खच्ची झालेल्या मानसिकतेवर मात केली आहे.

कथा तरी किती आणि कोणाच्या सांगाव्यात? सगळ्यांची जातकुळी ‘कोशिश करनेवालोंकी कभी हार नाही होती’ अशीच आहे. भाग्यश्री जाधव भारतीय संघाची ध्वजवाहक होती. ती महाराष्ट्र नांदेड जिल्ह्यात मुखेड तालुक्यातील होनवडजची. ती गोळाफेक खेळते. जीवनमरणाच्या संघर्षात तिने मृत्यूला मात दिली. वयाच्या एकोणीसाव्या वर्षी विवाह, त्याकाळात झालेली विषबाधा, त्यामुळे आलेले कायमचे अपंगत्व, ज्यांनी पिता म्हणून सांभाळ केला त्या काकांचा मृत्यू, अचानक नाकावर करावी लागलेली शस्त्रक्रिया, समाजाने दिलेली दुय्यम वागणूक अशी तिच्यावर आलेल्या संकटांची यादी लांबत जाणारी आहे. शितलादेवीला हात नाहीत. पण ती पाय आणि तोंडाच्या मदतीने तिरंदाजी करते. यावरूनच तिची जिद्द लक्षात येते.

- Advertisement -

भालाफेक करणार्‍या सुमितला वयाच्या सतराव्या वर्षी अपघातात पाय गमवावा लागला. तो हरियाणा सोनिपतमधील खेवरा गावचा. रोईंगपटू नारायणा कोंगनापल्ले सैन्यातील जवान. जम्मूमध्ये त्यांचे पोस्टिंग होते. भूसुरुंगाच्या स्फोटात त्यांचा पाय निकामी झाला. शारीरिक अपंगत्व व्यक्तीला मानसिक विकलांग करते. जीवनात काहीही रस राहिला नाही, अशी भावना प्रबळ होते. नैराश्य दाटून येते. तथापि सर्वांनी फिनिक्स पक्ष्यासारखी भरारी घेतली आहे. धडधाकट माणसे दमतात-थकतात.

स्वप्ने फार मोठी होती पण परिस्थितीच्या प्रतिकूलतेमुळे काहीच करता आले नाही, अशी सबब पुढे करताना आढळतात. तथापि पॅरालिम्पिकमध्ये सहभागी खेळाडू शारीरिक आणि मानसिक कमतरता, अवहेलना, तुलना, करुणा आणि दयाभाव अशा बाह्य आणि अंतर्गत आव्हानांवर मात करतात. त्यांचे रोजचे जगणे हाच एक संघर्ष असतो. पण त्याचे भांडवल न करता ते लढतात आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडतात. ‘तू खुद की खोज मैं निकल..तू किस लिये हताश हैं..तू चल तेरे वजूद की..समय को भी तलाश है..’ असे म्हणत त्यांचा जीवनप्रवास सुरू आहे. खूप स्वप्ने घेऊन भारतीय संघ पॅरालिम्पिकमध्ये सहभागी झाला आहे. त्यांच्या पाठीशी भारताच्या 140 कोटी लोकांच्या शुभेच्छा आहेत. त्यांचे स्वप्न पूर्ण होवो याच शुभेच्छा.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या