Tuesday, March 25, 2025
Homeअग्रलेखसंपादकीय : ३० जानेवारी २०२५ - मानवधर्माचा सामूहिक विक्रमी आविष्कार

संपादकीय : ३० जानेवारी २०२५ – मानवधर्माचा सामूहिक विक्रमी आविष्कार

दोनपेक्षा जास्त स्वयंपाकी एकत्र आले तर ते बनवत असलेला पदार्थ बिघडतो अशा आशयाची इंग्रजी भाषेत एक म्हण आहे. तथापि प्रजासत्ताक दिवस परेडच्या निमित्ताने कर्तव्यपथावर झालेले कलेचे सादरीकरण हा सामूहिक एकत्रिकरणाचा अप्रतिम नमुना ठरू शकेल. तब्बल पाच हजार कलाकारांनी त्यांची कला एकत्र सादर केली. सुमारे दहा मिनिटांच्या या सादरीकरणात सहभागी कलाकारांनी पन्नासहून अधिक नृत्यप्रकार सादर केले.

परेडमध्ये प्रथमच असा विक्रम नोंदवला गेला. ज्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये केली गेली. त्याची सुरावट दर्जेदार होती. त्या सादरीकरणात शब्देविण संवादू होता. प्रांतानुसार भाषा-पोशाख-नृत्यप्रकार-संगीताचा प्रकार-ठेका सारे वेगवेगळे होते, पण परस्परांचा उत्तम ताळमेळ होता. परस्पर सहकार्य होते. सर्व कलाकारांनी एकमेकांना समजून व सांभाळून घेतले.

- Advertisement -

सहभागी सगळीच माणसे माणसांशी माणसांसम वागल्यानेच हे शक्य होऊ शकले. म्हणजेच हजारो माणसे एकत्र येऊ शकतात. एकत्र सराव करू शकतात. विक्रमदेखील रचू शकतात. मग हीच एकतानता सामाजिक जीवनात अनुभवणे दुर्मिळ का होत चालले असावे? माणसांमध्ये जातीपातींवरून भेदाभेद का निर्माण होत असावेत? त्यापोटी माणुसकी, सहवेदना, संवेदनशीलता याला माणसे तिलांजली का देत असावीत? यामुळे सामाजिक वातावरण दूषित होते. कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणारे प्रसंग घडू शकतात.

पण मानवधर्म विसरणे हा मानवाचा मूळ स्वभाव नाहीच. हे माणसांनी लक्षात घेण्याची गरज आहे. भेदांवरून माणसांची डोकी फिरवली जातात, असे म्हटले जाते. तसा विचार करण्यास माणसांना भाग पाडले जाताना आढळते. हे जरी खरे असले तरी त्याला बळी पडायचे की नाही हे सामान्य माणसेच ठरवू शकतात. राष्ट्रपुरुषांचे, समाजसुधारकांचे आणि शिक्षण प्रसारकांचे विचार ते बळ सामान्यांना देतात. ते विचार अंगिकारणे ही काळाची गरज आहे. कारण दूषित वातावरणाचे भीषण परिणाम सामान्य माणसांनाच मोठ्या प्रमाणात भोगावे लागतात.

माणसांनी ठरवले तर त्यांना काहीही अशक्य नसते याचा आविष्कार कलाकारांनी दिल्लीत घडवला. सुमारे दहा मिनिटांत त्यांनी भारतातील विविधतेचे दर्शन प्रेक्षकांना घडवले. सामान्य माणसे नेहमीच्या आयुष्यात मानवधर्माचे दर्शन एकमेकांना नक्कीच घडवू शकतील. आज जे पेरले जाईल तेच भविष्यात उगवेल. पुढच्या पिढीसाठी उत्तम विचारांचे आणि मानवतेचे बी पेरण्याची नितांत गरज आहे हेच खरे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...