भारत तरुणांचा देश म्हणून ओळखला जात असला तरी आगामी सुमारे तीन दशकांनंतर भारत देश ज्येष्ठांचा देश बनू शकेल, असे सांगितले जाते. सर्वेक्षणांमध्ये तसा निष्कर्ष नमूद असल्याचे वृत्त माध्यमांत अधूनमधून प्रसिद्ध होते. 2050 पर्यंत भारतात ज्येष्ठांची संख्या सुमारे 35 कोटींपर्यंत जाईल, असा जागतिक अंदाज आहे. त्यांच्या संख्येबरोबरच समस्याही वाढत जातील.
सद्यस्थितीत बहुसंख्य ज्येष्ठ एकाकी आयुष्य घालवतात किंवा त्यांच्या वाट्याला एकटेपण आलेले आढळते. कुटुंबे छोटी होत आहेत. बहुसंख्य कुटुंबांचा आकार चौकोनी आढळतो. अनेकांची उदरनिर्वाहासाठी मुले घर सोडून इतर शहरात किंवा परदेशात स्थायिक होतात. अशा ज्येष्ठांसाठी एकटेपण अपरिहार्य असू शकेल. मोठमोठ्या शहरांमधील सोसायट्यांमधील घरांमध्ये वृद्ध मंडळी एकटी राहतात ही वस्तुस्थिती आहे.
माणसांनी भरलेल्या घरांमध्येही एकटेपण आलेली मंडळी आढळतात. त्याचीही काही कारणे आढळतात. विपरीततेची खंत करणे हा मानवी स्वभाव मानला जातो. तथापि अनेक जण परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारून त्यावर होकारात्मक मार्ग काढतात. ते त्यांच्या पातळीवर कुढत बसत नाहीत. कोणालाही दोष देत नाहीत आणि इतरांनाही तसे करू देत नाहीत. केरळमधील चंद्रदास केशवपिल्लई हे असेच एक व्यक्तिमत्त्व. ते शासकीय नोकरीतून निवृत्त झाले आहेत.
एकाकी ज्येष्ठांच्या समस्या त्यांना जाणवल्या. त्यांनी अशांसाठी सुरुवातीला त्यांच्या घरात ‘टॉकिंग पार्लर’ सुरू केले आहे. तिथे येऊन भावना व्यक्त करणे, विनोद सांगून एकमेकांना हसवणे, कला सादर करणे हे त्याचे स्वरूप आहे. आता या उप्रक्रमाचा चांगलाच विस्तार होत आहे. त्यांच्या परिसरात अशी सुमारे नव्वद केंद्रे सुरू झाल्याचे प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे. यावरून ज्येष्ठांसाठी त्याची आवश्यकता लक्षात येऊ शकेल.
ज्येष्ठांना नेमके काय हवे असते यावर अनेकदा चर्चा जडते. त्यांना विरंगुळा, आदर, त्यांच्या अनुभवाची आणि त्यांची दखल घेणे, तुम्ही अजूनही कुटुंबाला हवे आहात हे एखाद्या छोट्या कृतीतून दाखवणे त्यांना हवे असते. त्याचीच पूर्तता होणे अनेक कारणांमुळे अवघड बनत जाते. तेच चंद्रदास यांनी लक्षात घेतले असावे. समाज त्यांच्या क्रियाशीलतेचे निश्चित कौतुक करेल.
अन्यथा वाढत्या वयात गात्रे शिथिल होतात. शरीर साथ देत नाही. आरोग्य बिघडते. हे वास्तव असले तरी माणसे मनाने अधिक वृद्ध होत असावीत का? परिणामी त्यांचा स्वभाव तक्रारखोर आणि चिडचिडा बनत असू शकेल का? तथापि वयोवृद्धत्व येणे ही अपरिहार्यता आहे.
त्याला कोणताही पर्याय नाही. त्यामुळे परिस्थितीचा, ज्येष्ठत्वाचा, त्यामुळे येणार्या सर्वप्रकारच्या मर्यादांचा स्वीकार करून माणसे जमेल तेवढे उत्साही आणि ताजेतवाने राहू शकतात हे चंद्रदास आणि प्रेरणा घेणार्या इतरेजनांनी कृतीतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तो स्वागतार्ह आणि दिशादर्शक आहे.