Thursday, November 14, 2024
Homeअग्रलेखसंपादकीय : ३१ जुलै २०२४ - माणसांना हे कधी पटणार?

संपादकीय : ३१ जुलै २०२४ – माणसांना हे कधी पटणार?

समाजात अचानकच मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब वाढीला लागले असे मत सातत्याने व्यक्त होताना आढळते. कालपर्यंत सुदृढ आहेत असे वाटणार्‍या व्यक्तीचा हृदयविकाराच्या धक्क्याने अचानक मृत्यू होतो अशी बातमी समजते आणि माणसे अस्वस्थ होतात. तथापि ती अस्वस्थता काही काळापुरतीच निर्माण होत असावी का? उपरोक्त व्याधी खरेच अचानकच वाढीला लागल्या असाव्यात का?

माणसाने स्वीकारलेली बैठी जीवनशैली हेही या व्याधी जडण्याचे प्रमुख कारण आहे हे माणसांच्या कधी लक्षात येईल? आरोग्यात अचानक काहीच घडत नसते. अनारोग्याचे लक्षणे शरीरात काही काळ आधीपासून दिसतात. पण त्याकडे दुर्लक्ष करणे हा मानवी स्वभाव बनला आहे. देशात नुकत्याच केल्या गेलेल्या आर्थिक पाहणी अहवालात आणि राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षणात देखील याविषयी चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

- Advertisement -

वाढत्या स्थूलतेची समस्या गंभीर आहे. त्याला कोणताही वयोगट अपवाद नाही. एकूण आजारांपैकी सुमारे 55 टक्के आजार आहाराच्या वाईट सवयींमुळे होतात याकडे हे अहवाल लक्ष वेधून घेतात. चुकीच्या जीवनशैलीत आहाराच्या बिघडलेल्या सवयी म्हणजेच जंक फूडचे वाढलेले सेवन संतुलित आहाराचा अभाव, व्यायाम न करणे, झोप पूर्ण न होणे यांचा अंतर्भाव आहे. वास्तविक आरोग्यदायी जीवनशैलीवर भर देणारा, एकूणच शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे बघण्याचा व्यापक दृष्टिकोन देणार्‍या आयुर्वेदाची समाजाला संपन्न परंपरा आहे.

वैद्यांची अनेक घराणी तो वारसा पुढे चालवत आहेत. पण ‘जिथे पिकते तिथे विकत नाही’ हेच खरे असू शकेल का? आरोग्यदायी जीवनशैली कशी असावी याचे उत्तम मार्गदर्शन अनेक तज्ज्ञ करतात. कामाच्या बदलत्या वेळा आणि स्वरूप लक्षात घेऊन व्यक्तिपरत्वे बदल सुचवण्याची मुभा देखील दिली जातांना आढळते. म्हणजे परंपरेत देखील कालानुरूप बदल होताना आढळतात. प्रश्न आहे ते लोकांना कळते पण वळत का नसावे? माणसे तर्कसंगत विचार करू शकतात. ते मानवी स्वभावाचे वैशिष्ट्य मानले जाते.

आरोग्यदायी जीवनशैली अंमलात आणणे का आवश्यक आहे या मागचा तर्क तज्ज्ञ समजावून सांगतात. तरीही माणसांना ते का पटत नाही? अनारोग्याचा एक फटका लोकांचे आर्थिक, शारीरिक आणि मानसिक गणित बिघडवतो याची असंख्य उदाहरणे समाजात आढळतात. तो फटका बसण्यापेक्षा आरोग्यदायी बदल स्वीकारणे जास्त सोपे आणि सर्वार्थाने हिताचे आहे हे माणसांना पटण्यासाठी अजून किती अहवाल प्रसिद्ध व्हावे लागतील?

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या