Wednesday, February 4, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : ३१ मे २०२५ - निर्णयाचे गांभीर्य लक्षात घेतले जाईल?

संपादकीय : ३१ मे २०२५ – निर्णयाचे गांभीर्य लक्षात घेतले जाईल?

२०२७ मध्ये होणार्‍या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील पुलांचे संरचनात्मक लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) केले जाणार आहे. तसे वृत्त माध्यमांत प्रसिद्ध झाले आहे. पूर्वीच्या काळी गोदावरी नदीच्या अल्याड-पल्याड करण्यासाठी नावा असायच्या. त्यावरून एका दरवाजाला नाव दरवाजा असे नाव पडले. नदीवर दगडी सांडवेदेखील होते. ब्रिटिशांनी त्यांच्या कालखंडात नदीवर व्हिक्टोरिया नावाचा पूल बांधला. तो पहिला पूल. या पुलाच्या बांधकामाला शंभर वर्षे पूर्ण झाली तेव्हा त्यासंदर्भातील पत्र जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले होते.

प्रत्येक बांधणीचे ठराविक आयुष्य असते हे यावरून लक्षात येते. म्हणजेच त्या कालावधीत आणि विशेषतः नंतरही त्या बांधकामाचे परीक्षण होणे आवश्यक असते. उदाहरणार्थ, गोदावरी नदीवरील रामसेतू पूल पुरात कधीही वाहून जाईल अशा स्थितीत आहे. त्यावरील वाहनांची वाहतूक तर कधीच बंद केली गेली आहे. नदीपात्रात थोडे जरी पाणी सोडले तरी हा पूल पाण्याखाली जातो. नंतरच्या काळात गोदावरी नदीवर अनेक पूल बांधले गेले. त्यापैकी काही अर्धवट अवस्थेत आढळतात. त्यांचे बांधकाम पूर्ण करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. संरचनात्मक लेखापरीक्षणाच्या ढोबळ व्याख्येतच त्याचे महत्त्व दडले आहे.

- Advertisement -

यात तज्ज्ञांकडून बांधकामाची तपासणी केली जाते. त्यात त्याची अवस्था, आणखी किती काळ ते बांधकाम टिकाव धरू शकेल यासह विविध प्रकारच्या आवश्यक चाचण्या, अहवाल, त्यात काढले गेलेले निष्कर्ष, त्या माहितीचे पृथ्थकरण आणि त्यावर आधारित उपाययोजना सुचवणे त्यात अपेक्षित असते. पूल असतील तर त्यांच्या वहन क्षमता, काळानुसार बांधकामात झालेले बदल, तडे गेले आहेत का, त्यांच्या पायावर काही परिणाम झाला आहे का अशा अनेक बाबी तपासल्या जातात.

YouTube video player

सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट का गरजेचे आहे हे आता वेगळे स्पष्ट करायला नको. तथापि ढोल-ताशांच्या गजरात निर्णय जाहीर तर केले जातात पण अंमलबजावणीच्या पातळीवर घोडे पेंड खाते. याची कितीतरी उदाहरणे सांगितली जाऊ शकतात. जाहिरात फलकांचे, आस्थापना असलेल्या इमारती, गृहसंकुले आणि रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणा यांच्या स्ट्रक्चलर ऑडिटची घोषणा वारंवार केली जाते.

पण अशा घोषणांचे पुढे काय होते हे कोणता अधिकारी ठामपणे सांगू शकेल? पुलांच्या तपासणीची घोषणाही त्याला अपवाद नाही. नाशिकच्या एका सिंहस्थात चेंगराचेंगरीच्या दुर्दैवी घटनेत काही निष्पाप भाविकांचे जीव गेले होते. आगामी कुंभमेळ्यात तर सुमारे दहा कोटी भाविक नाशिकला भेट देतील असा अंदाज व्यक्त केला जातो. त्यामुळे आतातरी पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा निर्णय अंमलात आणला जाईल अशी अपेक्षा नाशिककरांनी करावी का?

ताज्या बातम्या

Soybean Rate : राहाता बाजार समितीत सोयाबीनची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी सोयाबीनला (Soybeans) 5500 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनच्या 37 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला...