अनेकांच्या मनातील नववर्षाचे संकल्प अजूनही ताजेतवाने असतील. काहींचा त्या दिशेने प्रयत्नही सुरु असतील. त्याबरोबरीने सर्वांनी एक संकल्प जाणीवपूर्वक करणे ही काळाची गरज आहे. ’डिजिटल डिटॉक्स’ हा तो संकल्प. म्हणजे नेमके काय? डिजिटल उपकरणांच्या वापरापासून स्वतःला काही काळ ठरवून दूर ठेवणे म्हणजे ‘डिजिटल डीटॉक्स’.
त्याच्या व्याख्येतच त्याच्या अती वापराचा इशारा दडला असावा का? कारण डिजिटल उपकरणांचा गरजेनुसार वापराशी लोकांची फारकत झाली असून बहुसंख्य लोक त्याच्या आहारी गेले आहेत. व्यसनच जडले आहे असे म्हणणे अधिक संयुक्तिक ठरू शकेल. हे कोणा ऐर्यागैर्याचे निरीक्षण नाही. तज्ज्ञांनी अभ्यासाअंती काढलेला निष्कर्ष आहे. या मुद्यावर जगभरात सतत सर्वेक्षणे आणि संशोधन सुरु असते. त्याचे निष्कर्ष अधुनमधुन प्रसिद्ध होतात. ते डिजिटल साधनांच्या व्यसनाच्या मुद्याकडे लक्ष वेधून घेतात. त्यावर सर्वांचे एकमत आढळते. डिजिटल जगाच्या आहारी जाण्याचे भयंकर दुष्परिणाम समाज भोगत आहे.
लोक वास्तवापेक्षा काल्पनिक जगातच रमतात. परिमाणी इतरांकडून अवास्तव अपेक्षांमध्ये कमालीची वाढ आढळते. या माध्यमांवर कोणत्याही निमित्ताने भावनांचा पूर वाहतो. लोक एकमेकांना प्रत्यक्ष भेटणे जणू विसरले आहेत. परिणामी भावभावना, संवादातील कायिक-वाचिक चढउतारांचे महत्व आणि जिव्हाळा किती गरजेचा असतो याची जाणीव ही तर फार दूरची गोष्ट झाली आहे. सवय कोणी लावून घेतली याच्या उत्तरातच ती सोडण्याचा उपाय सापडू शकेल. म्हणजेच डिजिटल साधनांचे दुष्परिणाम टाळणे माणसांच्याच हातात आहे. त्याचे उपाय तज्ज्ञांनी सुचवले आहेत. सुचवतही असतात.
अनेक सामाजिक संस्था या क्षेत्रात स्वयंस्फूर्त काम करतात. हे सगळेच ठराविक वेळ डिजिटल साधने दूर ठेवायला सांगतात. नव्या वर्षात त्याची सुरुवात करून पाहायला काय हरकत असू शकेल? साधने लांब ठेवल्याने सुरुवातीला कदाचित अस्वस्थ वाटू शकेल. तो वेळ कसा घालवावा हेही सुचणार नाही. मन त्या साधनांकडे ओढा घेऊ शकेल. व्यसन त्यालाच तर म्हणतात.
पण तो क्षण एकदा का टाळायची सवय जडली तर ती साधने दूर ठेवल्यांनंतर मिळणार्या वेळेच्या सदुपयोगाचे उपाय देखील गवसतील. निसर्ग खुणावेल. मित्र आठवतील. कुटुंबियांबरोबर गप्पा मारण्यातील, फिरायला जाण्यातील मजा अनुभवणे शक्य होईल. अर्थात यासाठी प्रचंड निर्धार आणि निश्चय करावा लागेल. त्याचे फायदे संत तुकाराम महाराजांनी म निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेचि फळफ अशा अनेक अभंगांमधून आणि समर्थ रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकांमधून सांगितलेच आहेत. तेव्हा, नव्या वर्षात त्याची सुरुवात होऊ शकेल का?