मराठी भाषा संवर्धनासाठी साजरे केले जाणारे विविध दिवस आणि संमेलने पार पडली की, तिच्या विषयीचा उमाळा अंमळ जरा शांत होतो. लोक आणि राज्याचे कारभारी त्यांच्या त्यांच्या वाटेने पुन्हा कामाला लागतात. मराठी भाषा टिकावी म्हणून या काही दिवसांत अनेक उपाय सुचवले जातात. परिसंवाद झडतात. भाषणे होतात. मराठी टिकवण्याची जबाबदारी सामान्य मराठी जणांवर आहे, यावर मात्र बहुतेक जणांचे एकमत आढळते. हीच सामान्य माणसे मराठी भाषेसाठी धडपड करताना दिसतात.
भीमाबाई जोंधळे यांचा कविवर्य मंगेश पाडगांवकर भाषा संवर्धक पुरस्कार देऊन नुकताच सन्मान करण्यात आला. भीमाबाई नाशिकला ‘पुस्तकांचे हॉटेल’ चालवतात. त्यांच्या या हॉटेलमध्ये आठ हजार पुस्तके आहेत. पोटपूजा करता करता माणसे त्यांची वाचनाची भूकही भागवतात. येथे येणार्याला वेळ काळाचे बंधन नाही. वाचनाची तंद्री लागली तर पुस्तकप्रेमी कितीही वेळ तेथे बसू शकतात. मंदार जोगळेकर आणि संजय पेठे यांनी एक संकेतस्थळ सुरु केले. त्यावर मराठी भाषेतील हजारो पुस्तके जगभरातील वाचकांना उपलब्ध झाली. विनम्र भाबळ फेसबुकवर ‘वाचनवेडा’ नावाचा समूह चालवतात. अनेक युवा लहान मुलांसाठी मराठी भाषेला वाहिलेली मासिके काढतात. खिशाला खार लावून अनेकदा छापतात.
न्यायाची भाषा मराठी असावी, यासाठी वकील शांताराम दातार यांनी लढा दिला. त्याची दखल घेऊन न्यायालयीन कामकाजात मराठीचा जास्तीत जास्त वापर व्हावा, अशी अधिसूचना काढण्यास शासनाला भाग पडले. मराठी प्रमाण भाषेच्या स्वरूपात एकवाक्यता आणण्याचे अमूल्य काम अरुण फडके यांनी केले. मराठी लेखनकोशाचे ते निर्माते होते. दातार आणि फडके आज आपल्यात नाहीत, पण त्यांचे हे कामच त्यांची ओळख आहे. मराठीच्या भवितव्याचा रस्ता खडतर आहे, याचे भान देण्याचा प्रयत्न दिल्ली मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी केला. त्यांनी व्यक्त केलेले मत शासनस्तरावर गांभीर्याने घेतले जाईल, अशी अपेक्षा आहे.
तथापि, असंख्य सामान्य माणसे आपापल्या परीने मराठी भाषेच्या उज्ज्वल भवितव्यासाठी वेगवेगळे प्रयोग करतात. ते कोणत्याही वादात पडत नाहीत. आपल्या कामांची दखल घेतली जावी, अशी त्यांची अपेक्षाही नसते. आपले काम ते शांतपणे करतात. तंत्रज्ञान बदलत आहे. त्याचा वापर मराठी संवर्धनासाठी कसा केला जाऊ शकेल, यावर विचारमंथन होण्याची गरज आहे. ती जबाबदारी जाणत्यांची आहे. मराठी भाषा संवर्धनातील अडथळे बहुधा सर्वांनाच ठाऊक असावेत. त्यावर मार्ग शोधणे सर्वांनाच जमेल असे नाही, पण निदान तसे प्रयत्न करणार्यांच्या मागे पाठबळ उभे करणे हे मराठी जणांचे कर्तव्यच आहे.