प्रयागराज महाकुंभमेळ्याची नुकतीच सांगता झाली. तरीही या महाकुंभमेळ्यात रचल्या गेलेल्या विक्रमांचे कवित्व अजून काही काळ सुरूच राहील. महाकुंभमेळा संपल्यानंतर तेथील स्थानिक स्वराज्य संस्थेने संपूर्ण परिसरात तातडीने स्वच्छता मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. त्यात तात्पुरत्या केल्या गेलेल्या सर्व व्यवस्थांचा (तंबू, मंडप, जलवाहिनी आदी) समावेश आहे. या तात्पुरत्या व्यवस्था काढून टाकल्या जाणार आहेत.
विशेष म्हणजे महाकुंभ सुरु असतानाच तीनशे सेवकांनी एकाच वेळी सर्व घाट आणि नदीची स्वच्छ केली. या संपूर्ण प्रक्रियेचे चित्रीकरणही करण्यात आल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले. कुंभादरम्यान एकाच दिवशी पंधरा हजार सेवक स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये याची नोंद झाली आहे. स्वच्छता मोहिमेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही करण्यात आल्याचे सांगितले जाते. इतकी व्यापक असलेली ही मोहीम अचानक राबवली गेली नाही. विक्रमही अचानक नोंदवला गेला नाही.
पूर्वनियोजनाशिवाय अशा मोहिमा राबवणे शक्य होईल का? नाशिकला दोन वर्षांनी होऊ घातलेल्या सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर प्रयागराजमधील महाकुंभमेळ्याकडे पाहिले पाहिजे. सिंहस्थकाळात स्वच्छता हा आरोग्यासाठी महत्वाचा मुद्दा असतो. त्यादृष्टीने आतापासून विचार केला जावा, असे नाशिककरांना अपेक्षित असेल. गोदावरी जलप्रदूषण हा गंभीर चिंतेचा विषय आहे. त्यावर अनेकदा चर्चा झडतात. उपाय योजले जाणार असल्याच्या घोषणाही सरकार अथवा प्रशासनाकडून केल्या जातात, पण अनेकदा ते ‘अळवावरचे पाणी’ च ठरल्याचे दिसते. उदा., नदीपात्रात थेट सोडले जाणारे सांडपाणी त्याचे मुख्य कारण आहे.
सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्याचे आदेश वारंवार काढले जातात. मात्र, त्यानुसार कार्यवाही झाल्याचे नागरिकांच्या अनुभवास कधी येत नाही. परिणामी नदीतून पाणी वाहते की फेस, हा प्रश्न कायम राहतो. नाशिकची लोकसंख्या पस्तीस लाखांपुढे गेल्याचे बोलले जाते. सिंहस्थादरम्यान नाशिकलाही कोट्यवधी भाविक भेट देतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. शहरातील एकूण व्यवस्थांवर आणि नदीवर त्याचा ताण येणे स्वाभाविक आहे.
सार्वजनिक स्वच्छता हा त्यातील एक महत्वाचा मुद्दा! त्यादृष्टीने प्रयागराज स्वच्छता अभियानाचा अभ्यास केला जाईल का? कोट्यवधींच्या गर्दीतसुद्धा स्वच्छता मोहीम कशी सुरु ठेवली गेली? त्यात तंत्रज्ञान कसे वापरले? हा प्रशासनाच्या दृष्टीने विशेष अभ्यासाचा विषय ठरेल. आगामी सिंहस्थाच्या नियोजन अभ्यासासाठी नाशिकच्या अधिकार्यांनी प्रयागराजला भेट दिली. त्यांनी याचा आढावा घेतलाच असेल. तसे योजनाबद्ध नियोजन केले जाऊन नाशिकच्या सिंहस्थात त्याचे प्रतिबिंब अनुभवास येईल, अशीच येथील जागरूक नागरिकांची अपेक्षा असेल.