दिवस उन्हाळी पर्यटनाचे आहेत. तसेही अलीकडच्या काळात पर्यटनाला चांगले दिवस आले आहेत. परिणामी तिन्ही ऋतूत कुठल्या ना कुठल्या ठिकाणी पर्यटनप्रेमींचे पर्यटन सुरूच असते. ते अधिक सुरक्षित आणि सुखदायी व्हावे, अशीच पर्यटकांची अपेक्षा असते. त्याच उद्देशाने ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’तथा ‘पर्यटन मित्र’ स्थापन करण्याचा निर्णय सरकारने नुकताच जाहीर केला आहे.
पर्यटकांची सुरक्षा हा त्यामागचा प्रमुख उद्देश असल्याचे आणि त्या बरोबरीने पर्यटन स्थळांविषयी माहिती पुरवण्याचे काम हे मित्र करतील, असेही सरकारकडून सांगण्यात आले. पर्यटन हा जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. एकदा तरी फिरायला जाण्याची प्रत्येकाची इच्छा असतेच. पर्यटनातून रोजगार निर्मिती होते. राज्याच्या अर्थव्यवस्थेत भर पडते. अनेकांना उदरनिर्वाहासाठी संधी निर्माण होते. म्हणून पर्यटन सुरक्षित आणि सुखदायी व्हावे ही काळाची गरज मानता येईल. पर्यटकांना होणार्या अपघातांमुळे अनेक ठिकाणे बदनाम मानली जातात.
नैसर्गिक आपत्तींमुळे अपघात होऊ शकतात. तथापि बर्याचदा पर्यटकांचा अतिउत्साह त्यांच्या अंगाशी आल्याचे दिसते. ‘काही होत नाही..’ अशी बेफिकिरी दाखवली जाते. सेल्फी काढणे, रिल्स बनवणे, निसरड्या किंवा पाण्याच्या ठिकाणी अनाठायी धाडस करणे; प्रसंगी जीवाशी खेळ ठरू शकते. तशा घटना अधूनमधून घडतात. सरकारच्या नियोजित उपक्रमातील ‘पर्यटन मित्र’ तो धोका पर्यटकांच्या लक्षात आणून देऊ शकतील. प्रसंगी अटकाव करण्याचा प्रयत्न करू शकतील. अर्थात त्यांचे प्रयत्न प्रभावी ठरणे पर्यटकांच्याच सहकार्यावर अवलंबून असेल.
अनेक पर्यटनस्थळी धोक्याच्या सूचना देणारे फलक लावलेले असतात. स्थानिक लोक सूचना करतात. किती पर्यटक ते मनावर घेतात? तेव्हा, अशा पुढाकारामागचा उद्देश पर्यटकांनी लक्षात घेण्याची गरज आहे. पर्यटनस्थळांची माहिती सर्वाना असतेच असे नाही. सर्वच ठिकाणी मार्गदर्शकांची सुविधा उपलब्ध असू शकेल असे नाही. ती उणीव सरकारी ‘पर्यटन मित्र’दूर करू शकतील.
अनेकदा पर्यटनस्थळीदेखील उणीवा असू शकतात. पर्यटकांची काही निरीक्षणे किंवा तक्रारी देखील असू शकतील. अनेक पर्यटक अनुभवी आणि प्रशिक्षित असतात. त्यांच्याकडे अनुभवांचा खजिना असतो. अशा बाबतीत पर्यटन मित्र सरकार आणि पर्यटक यांच्यातील ते दुवा ठरू शकतील. पर्यटनासंबंधीचा सरकारचा हा निर्णय तातडीने अमलात यावा, अशीच पर्यटकांची अपेक्षा असेल.