Thursday, November 21, 2024
Homeअग्रलेखसंपादकीय : ६ नोव्हेंबर २०२४ - इंटरनेट साक्षरतेला पर्याय नाही

संपादकीय : ६ नोव्हेंबर २०२४ – इंटरनेट साक्षरतेला पर्याय नाही

ऑनलाईन आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढतच आहेत. त्याला आळा घालण्याचा प्रयत्न सरकार कसोशीने करते. तथापि गुन्हेगार मात्र त्या सगळ्यावर मात करताना आढळतात. कदाचित तज्ज्ञही कल्पना करू शकणार नाहीत असे फसवणुकीचे नवनवे मार्ग शोधतात. डिजिटल अरेस्ट हा त्यापैकीच. याद्वारे मुंबईतील एका डॉक्टरला सात कोटींचा गंडा घातल्याचे वृत्त माध्यमात नुकतेच प्रसिद्ध झाले.

डिजिटल अरेस्ट या प्रकारापासून सावध राहावे असे आवाहन पंतप्रधानांनी देखील नुकतेच केले. त्याचे टप्पे देखील लोकांना सांगितले. डिजिटल अरेस्ट हा शब्दही कदाचित अजून बहुसंख्यांना माहीत नसू शकेल. पण फसवणूक मात्र सुरु आहे. लोक ते समजून घेईपर्यंत गुन्हेगार कदाचित अजून एखादा मार्ग शोधतील. सरकारी पातळीवर असे गुन्हे रोखण्यासाठी सातत्याने संशोधन आणि प्रयत्न सुरु असतात. फसवणूक करणारे लाखो आयडी-सिमकार्ड सरकार बंद करते. बँक खाती गोठवते. यासाठी अनेक सरकारी संस्था कार्यरत असतात. तरीही फसवणूक होते.

- Advertisement -

आर्थिक फसवणुकीला घाबरून सामान्यांचा मोबाईल आणि इंटरनेटचा वापर थांबवता येऊ शकेल का? आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात तसे करणे अव्यवहार्य ठरेल. कारण हातात मावणार्‍या मोबाईलमध्ये संपूर्ण जग सामावले आहे हे वास्तव आहे. त्यामुळे इंटरनेट साक्षरतेला पर्याय नाही. स्मार्ट मोबाईलचा वापर तर करायचा पण त्यातील फारसे काही कळत नाही असा पवित्रा घ्यायचा असा दुटप्पीपणा आता उपयोगाचा नाही. ऑनलाईन आर्थिक फसवणूक टाळण्याचे अत्यंत सोपे मार्ग तज्ज्ञ वारंवार सांगतात. पंतप्रधानांनी देखील डिजिटल अरेस्ट कशी टाळता येऊ शकेल हे सांगितले.

ओटीपी, बँक आणि आर्थिक व्यवहाराची किंवा तुमची वैयक्तिक माहिती देऊ नका. कोणतीही सरकारी संस्था अशी माहिती फोनवरून विचारत नाही. शक्यतो अनोळखी क्रमांकावरून आलेले फोन उचलू नका हे काही कानमंत्र. तरीही लोक त्याच त्याच चुका करताना आढळतात. त्याचाच फायदा घेऊन गुन्हेगार लोकांना लुटतात. असे घडले तर नेमके काय करायचे हे देखील बहुसंख्यांना माहित नसते. तथापि याप्रकारची निरक्षरता किंवा तथाकथित भोळेपणा यापुढे उपयोगाचा नाही याची खूणगाठ लोकांनी मारलेली बरी.

आर्थिक फसवणूक टाळायची असेल तर सामान्य माणसांना देखील शहाणे व्हावेच लागेल. तज्ज्ञ वेळोवेळी सुचवत असलेले फसवणूक टाळण्याचे मार्ग समजून घेऊन अंमलात आणण्याला पर्याय नाही. घटना घडून गेल्यानंतर काळजी करण्यात कोणताही शहाणपणा नसतो. त्यापेक्षा फसवणूक घडूच नये याची काळजी-दक्षता घेणे-सावधानता बाळगणे यातच सामान्यांचे ऑनलाईन आर्थिक हित दडले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या