अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाला बसलेला धक्का हा केवळ जागांचा पराभव नाही, तर सत्तेच्या अमर्याद आत्मविश्वासाच्या जोरावर चालविलेल्या वावदूकपणाला मतदारांनी दिलेला स्पष्ट इशारा आहे. डेमोक्रॅटिक पक्षाने प्रतिनिधिगृह आणि सिनेट या दोन्ही सभागृहांवर नियंत्रण मिळवल्याने ट्रम्प यांच्या उर्वरित अध्यक्षीय कार्यकाळातील सत्ता समीकरण पूर्णपणे बदलणार आहे. ट्रम्प यांची धोरणे, निर्णयशैली आणि नेतृत्व यांचा हा अप्रत्यक्ष कौल होता. त्यामुळे हा निकाल त्यांच्या राजकीय वर्चस्वाची कठोर परीक्षा मानावी लागेल. या पराभवाचे प्रमुख कारण म्हणून इराणशी सुरू असलेल्या युद्धाकडे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी बोट दाखवले आहे.
युद्धामुळे सिनेटमधील बहुमत गमावण्याची किंमत मोजणे योग्य होते काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांची ही प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षातील वाढत्या अंतर्गत मतभेदांची निदर्शक आहे. यामुळे २०२८ च्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी पक्षात नेतृत्वाचे नवे समीकरण तयार होण्याची शयता आहे. दुसरीकडे, ट्रम्प यांनी युद्धाचा निर्णय योग्य असल्याचे सांगत त्याचे समर्थन केले. एकाच पराभवाकडे पक्षातील दोन सर्वोच्च नेते वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहत असतील, तर पक्षाच्या भविष्यासमोरचे आव्हान अधिक गंभीर ठरते. या पराभवाचे संपूर्ण खापर केवळ इराण युद्धावर फोडणे योग्य ठरणार नाही. अमेरिकन मतदारांसाठी महागाई, वाढते इंधन दर, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आणि सरकारी कारभारातील कथित भ्रष्टाचार हेही तितकेच महत्त्वाचे मुद्दे होते. निवडणुकीनंतरच्या सर्वेक्षणात जवळपास ९० टक्के मतदारांनी जीवनावश्यक खर्चाला मतदानातील महत्त्वाचा मुद्दा मानल्याचे स्पष्ट झाले. सुमारे दोनतृतीयांश मतदारांनी ट्रम्प यांच्या धोरणांमुळे महागाई वाढल्याचे मत व्यक्त केले.
इराण युद्धामुळे इंधन बाजारातील अस्थिरता वाढली आणि त्याचा परिणाम वाहतूक, उत्पादन तसेच दैनंदिन वस्तूंच्या किमतींवर झाला. ट्रम्प यांच्या राजकारणाची ताकद त्यांच्या आक्रमक शैलीत, ठाम घोषणांत आणि समर्थकांशी थेट संवाद साधण्याच्या पद्धतीत राहिली आहे. मात्र, याच शैलीने विरोधकांना एकत्र आणण्याचे आणि समाजातील ध्रुवीकरण वाढवण्याचे काम केले. संस्थांशी संघर्ष, निर्णयातील एकतर्फीपणा, व्यापारशुल्कांचा आक्रमक वापर, स्थलांतर धोरणातील कठोरता आणि मित्रदेशांशी ताणलेले संबंध यामुळे त्यांच्या नेतृत्वाबद्दल प्रश्न उपस्थित झाले. निवडणूक म्हणजे केवळ प्रचारसभांतील गर्दी किंवा घोषणांची लोकप्रियता नव्हे; तर सत्तेतील निर्णयांचा सामान्य नागरिकांच्या आयुष्यावर झालेला परिणाम तपासण्याची ती संधी असते. अमेरिकेच्या घटनात्मक व्यवस्थेत मध्यावधी निवडणुकांना विशेष महत्त्व आहे. अध्यक्षांचा कार्यकाळ कायम असला, तरी काँग्रेसवरील नियंत्रण बदलल्याने विधेयके, अर्थसंकल्प, महत्त्वाच्या नियुक्त्या आणि सरकारी धोरणांवर विरोधी पक्षाचा प्रभाव वाढतो.
डेमोक्रॅटिक बहुमतामुळे ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयांची अधिक कठोर चौकशी होण्याची शयता आहे. मात्र, विरोधकांनी केवळ सत्ताधार्यांना अडचणीत आणण्यापुरते राजकारण न करता महागाई, रोजगार आणि राष्ट्रीय सुरक्षेबाबत ठोस पर्यायही मांडले पाहिजेत. या निकालाचे पडसाद भारतासह संपूर्ण जगावर उमटू शकतात. व्यापारशुल्क, जागतिक पुरवठा साखळी, तंत्रज्ञान क्षेत्र आणि इराणमधील संघर्ष याबाबत अमेरिकेच्या धोरणात अनिश्चितता निर्माण होण्याची शयता आहे. विशेषतः भारतासाठी ऊर्जा सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा आहे. इराण आणि आखाती देशांतील तणावामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्यास भारतीय अर्थव्यवस्थेवरही त्याचे पडसाद उमटू शकतात. अमेरिका हा भारताचा महत्त्वाचा सामरिक आणि आर्थिक भागीदार असल्याने वॉशिंग्टनमधील सत्तासंघर्षाचा द्विपक्षीय संबंधांवर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी भारताने सावध आणि राष्ट्रीय हिताला प्राधान्य देणारी भूमिका ठेवणे आवश्यक आहे. लोकशाहीत मतदारांचा कौल हा सत्ताधार्यांसाठी केवळ पराभव नसतो, तर आत्मपरीक्षणाची संधी असते.
त्याचबरोबर डेमोक्रॅटिक पक्षालाही मिळालेल्या बहुमताचा उपयोग केवळ ट्रम्प यांना रोखण्यासाठी न करता पर्यायी धोरणे मांडण्यासाठी करावा लागेल. ट्रम्प यांनी या निकालाकडे विरोधकांचे यश म्हणून न पाहता जनतेच्या नाराजीचा संदेश म्हणून पाहिले पाहिजे. आर्थिक दिलासा, पारदर्शक कारभार आणि जबाबदार नेतृत्व हीच आता त्यांच्या प्रशासनाची खरी कसोटी आहे. सत्तेची ताकद कितीही मोठी असली, तरी जनतेच्या विश्वासापेक्षा ती मोठी नसते. हा पराभव ट्रम्प यांच्यासाठी दिलेला स्पष्ट इशारा आहे. घोषणा मतदारांना आकर्षित करू शकतात; मात्र जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी परिणामकारक, उत्तरदायी आणि लोककल्याणकारी कारभारच आवश्यक असतो.




