Friday, January 23, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : ७ जानेवारी २०२६ - जगाच्या ठेकेदाराची दादागिरी

संपादकीय : ७ जानेवारी २०२६ – जगाच्या ठेकेदाराची दादागिरी

अमेरिका स्वतःला जगाचा एकमेव तारणहार-पालनहार समजते आणि या गृहीतकाला सगळ्या जगाने मान तुकवून मान्यता द्यावी असा अट्टहास नेहमी सुरु असतो. त्यासाठीच मनमानी करून वाट्टेल त्या मार्गाने जग अशांत ठेवणे हाच प्राधान्यक्रम आढळतो. व्हेनेझुएला देशावरचे आक्रमण हा त्याचाच एक भाग आहे. त्याची कितीही आणि कोणतीही कारणे अमेरिका म्हणजेच ट्रम्प सांगत असले तरी व्हेनेझुएलामधील खनिज तेलसाठ्यांवर अमेरिकेची नजर आहे हे जग ओळखून आहे. अमेरिकन तेल कंपन्या व्हेनेझुएलात काम करतील असेही ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. म्हणजेच या घुसखोरीच्या मुळाशी तेल आणि सोनेे हीच बाब प्रमुख आहे. रशियाने भारताला तेल पुरवणे अमेरिकेला मान्य नाही.

- Advertisement -

व्हेनेझुएलाचे चीनला तेल पुरवणे आिणि त्यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध ही बाबही अमेरिकेला नेहमीच खुपत आली. चीन आणि अमेरिकेचे वैर जगजाहीर आहे. व्हेनेझुएलामध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीला अमेरिकेने मान्यता दिलेली नाही. मुळात व्हेनेझुएलामध्ये कमालीची अशांतता आहे. लाखो लोक देश सोडून जात आहेत. तशातच अमेरिकेने वाढीव निर्बंध लादले आहेत. तेलनिर्यातीवरच्या निर्बंधांमध्ये त्यामुळे वाढ झाली आहे. परिणामी देशांतर्गत परिस्थिती अधिकच खालावत जाईल. तसतसे आर्थिक संकट वाढेल. व्हेनेझुएलानंतर क्युबा, मेक्सिको, कोलंबिया हे निशाण्यावर असल्याची गर्जना म्हणजे अमेरिका स्वतःला जगाचा नीतिमत्तेचा ठेकेदार मानते त्याचेच द्योतक आहे. मादुरो यांच्या हुकूमशाहीला विरोध आणि लोकशाहीला बळ असे हल्ल्याचे समर्थन करणार्‍या अमेरिकेचे स्वतःचे वर्तन मात्र त्याच्या एकदम विरुद्ध आहे.या देशाच्या अध्यक्षाना अमेरिकेने ज्या पद्धतीने पकडून नेले त्यावर जगातील चीन आणि रशियासह अनेक देशांनी आक्षेप घेतला. पण अमेरिका कोणालाच जुमानत नाही हे याआधीही अनेकदा सिद्ध झाले आहे.अमेरिकेत अशांतता आहे.

YouTube video player

अमली पदार्थांचा वापर चिंताजनक आहे. ट्रम्प यांच्या टेरिफला अमेरिकतेच विरोध आहे. हा निर्णय रद्द करावा अशी तेथील काही संसद प्रतिनिधींची जाहीर मागणी आहे आणि अमेरिकेला मात्र व्हेनेझुएलातील लोकशाहीची काळजी वाटते.जगाने अमेरिकेची दादागिरी मान्य करावी असा अमेरिकेचा अट्टहास असला तरी अमेरिका मात्र कोणत्याही आंतरराष्ट्रीय संघटनांचे ऐकणार नाही. आंतरराष्ट्रीय कायद्यांना आणि नियम मानणार नाही. इतर देशांचे सार्वभौमत्व मान्य करणार नाही. कोणत्याही देशात घुसणे आणि मनमानी करणे हा जन्मसिद्ध हक्क मानते हा सारासार दुटप्पीपणा आहे. ज्याला टेरिफ युद्धाच्या निमित्ताने भारताने काही प्रमाणात तरी आव्हान दिले असे मानले जाते. वर्चस्व प्रस्थापित करणे, हा कोणत्याही युद्धाचा किंवा आक्रमणाचा हेतू सांगितला जातो. तथापि बदलत्या काळात नैसर्गिक साधनसंपत्ती आणि खनिजे हाच वर्चस्वाचा केंद्रबिंदू असेल. त्या साठ्यांवर ताबा मिळवणारा देश जगावर वर्चस्व गाजवू शकेल हे ट्रम्प जाणून आहेत. भारताची रशियाकडून तेलखरेदी म्हणूनच तर खटकते.

शक्तिशाली देशाची एकतर्फी घुसखोरी आणि युद्धखोरी जागतिक नियमांना आणि निर्बंधांना कशी वळचणीला टाकू शकते याचे हे अमेरिकेच्या बाबतीतील पहिलेच उदाहरण नाही. जिओ पॉलिटिक्सनुसार याबाबतीत देशांची वेगवेगळी भूमिका आढळते. हल्ल्याच्या बाजूने आणि विरोधात असे चित्र आहे. तरीही अमेरिकेची दादागिरी, सार्वभौमत्वाला आव्हान आणि नैसर्गिक साधनसंपत्तीवर ताबा मिळवण्याची खुमखुमी जग कुठवर सहन करणार असा प्रश्न तज्ज्ञांनीही विचारला आहे. भारत आणि व्हेनेझुएला यांच्यातील संबंध मर्यादित आहेत. हल्ल्यानंतरच्या चोवीस तासांनी भारताने अधिकृत प्रतिक्रिया दिली. व्हेनेझुएलन नागरिकांची सुरक्षितता आणि त्यांचे हित याला भारताचा पाठिंबा आहे. त्या देशात असलेल्या भारतीयांनी खबरदारी घ्यावी आणि भारतीयांनी सध्या तरी त्या देशातील अनावश्यक प्रवास टाळावा अशा मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.

कोणत्याही एका पक्षाचे समर्थन करणे टाळले आहे. जसे, रशिया-युक्रेन युद्धाच्या वेळी देखील घडले होते. तरी व्हेनेझुएला आक्रमणाने भारतासमोर गुंतागुंतीचे राजकीय प्रश्न निर्माण केले आहेत असे अभ्यासकांनी देखील म्हंटले आहे. या सगळ्या गदारोळात व्हेनेझुएलन नागरिक मात्र भरडले जात आहेत.बेरोजगारी आणि अस्थिरतेमुळे लाखो लोक देश सोडून जात आहेत. या दुष्टचक्रातून त्यांची सुटका कधी होणार हाही प्रश्नच आहे.

ताज्या बातम्या

Shirdi : संरक्षण उत्पादनाचे महत्वपूर्ण केंद्र म्हणून अहिल्यानगरचे नाव जगासमोर येणार

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेतून देशाच्या संरक्षण उत्पादनाचे महत्वपूर्ण केंद्र म्हणून भविष्यात अहिल्यानगरचे नाव जगासमोर येणार असून संरक्षण क्षेत्रात प्रगती...