समाजमाध्यमे आणि ओटीटी व्यासपीठावरून सादर होणार्या अश्लील सादरीकरणाने सर्व प्रकारच्या मर्यादा ओलांडल्या आहेत अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली. त्याला आळा घालण्यासाठी तातडीने पावले उचलावीत अशी सूचनाही सरकारला केली. यासंदर्भातील याचिकेची सुनावणी सध्या सुरु आहे.
मोबाईल वापराबाबतचे न्यायसंस्थेचे निरीक्षण पालकांनी गंभीरपणे घ्यायला हवे. विविध कारणांमुळे लहान मुलांकडे मोबाईल सोपवला जातो. त्यावर मुले नेमके काय बघतात याकडे बहुसंख्य पालकांचे दुर्लक्ष असते हे वास्तव आहे. हळूहळू मुलांकडून मोबाईलचा वापर आणि वेळ घालवणे वाढते. मुले त्यांच्या वयाला साजेसे सादरीकरण न बघता अश्लील सादरीकरण बघतात हे क्वचितच काही पालकांच्या लक्षात येते. तेव्हा त्या त्या पालकांच्या बाबतीत काही प्रतिक्रिया एकसारख्याच घडतात. पालकांना धक्का बसतो आणि ते मुलांच्या हातात मोबाईल देणे बंदच करतात. त्याचा परिणाम उलटाच घडताना आढळतो.
मुले मोबाईल प्राप्तीचे नको ते मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात. यावर मुलांशी पालकांचा गुणवत्तापूर्ण संवाद हा यावरचा उपाय सुचवला जातो. या संवादात मुलांच्या वयाचे वाढते टप्पे, त्या त्या काळात होणारे शारीरिक आणि मानसिक बदल, त्यांची नैसर्गिकता, त्याचे अर्थ मुलांना समजावून सांगितले जायला हवेत. त्या त्या वयाला साजेशा गोष्टी करणे अपेक्षित का असते याचे भान आणून देता येईल. वयाच्या बदलाच्या टप्प्यांवर विशेषतः शारीरिक बदलांसंदर्भात मुलांना अनेक प्रश्न पडतात. त्याची उत्तरे या संवादातून मुलांना मिळू शकतील याची दक्षता पालकांना घेता येऊ शकेल. असा मोकळेपणा निर्माण करणे आणि तो राखणे ही पालकांची जबाबदारी आहे.
ज्यांना हे शक्य नसेल त्यांच्यासाठी समुपदेशकांचा मार्ग उपलब्ध आहे. पालक शिक्षकांनाही विश्वासात घेऊ शकतात. मुलांच्या वाढीला आणि सर्वांगीण विकासाला योग्य दिशा देण्यात शिक्षकांचा सहभाग अमूल्य आणि अपेक्षितही आहे. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर मुलांची समज योग्य पद्धतीने कशी वाढेल याची काळजी पालकांनी घ्यायला हवी. ती समज वाढली तर सादरीकरणाच्या परिणामांची तीव्रता आणि मुले त्याच्या आहारी जाण्याचा धोका कदाचित कमी होऊ शकेल. पालक आणि मुलांच्या परस्पर संवादाचा अजून एक सकारात्मक परिणाम अनुभवता येऊ शकेल.
भविष्याच्या दृष्टीने मुलांच्या आवडीनिवडी, त्यांच्या मनाचा कल लक्षात येऊ शकेल. अडनिडे वय जसे मुलांसमोर प्रश्न निर्माण करणारे असते तसेच ते त्यांच्या कौशल्य विकासाचे देखील मानले जाते. कल लक्षात आला तर मुलांना त्या त्या प्रकारची कौशल्ये विकसित करण्यासाठी संवादाची मदतच होईल. अश्लील सादरीकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना केंद्र सरकार अंमलात आणेल तेव्हा आणेल. पण तोपर्यंत पालकांचा उपरोक्त पुढाकार आणि सुसंवाद मुलांना आश्वासकच वाटेल.