Wednesday, January 15, 2025
Homeअग्रलेखसंपादकीय : ८ जानेवारी २०२५ - काही बोलायचे आहे

संपादकीय : ८ जानेवारी २०२५ – काही बोलायचे आहे

मासिक पाळीचे चक्र आणि त्याच्याशी संबंधित मानसिक आणि शारीरिक आरोग्य हा अजूनही दुर्लक्षित विषय आहे. मासिक पाळीचे चक्र सुरळीत सुरु राहाणे महिलांच्या सर्वांगीण आरोग्याच्या दृष्टीने अत्यावश्यक असते. तथापि एकूणच दैनंदिन आयुष्यातील अनेक घटकांमुळे ते चक्र प्रभावित होते. परिणामी त्या पाच दिवसांत अनेकींना समस्या जाणवतात. तथापि महिलांमध्येच या मुद्याला धरून मोठ्या प्रमाणावर संकोच आढळतो.

इतका की अगदी चारचौघीत देखील महिला बोलणे टाळतात. किंबहुना बहुसंख्य जणींमध्ये ‘हा काय बोलण्याचा विषय आहे, त्यावर काय बोलायचे?’ असाच दृष्टिकोन आढळतो. केवळ मासिक पाळीच नव्हे तर एकूणच आरोग्य समस्यांच्या बाबतीत महिला स्वतःला गृहीत धरतात हा भाग अलाहिदा. मासिक पाळीशी संबंधित आरोग्यावर जनजागृती करण्यासाठी जगभर मासिक पाळी स्वच्छता दिवस म्हणूनच साजरा केला जातो.

- Advertisement -

तथापि याबाबतीत खोलवर जाणिवा रुजण्यासाठी फार मोठी वाटचाल करावी लागणार आहे. त्या पाच दिवसात किमान स्वच्छतेविषयी बहुसंख्य स्त्रीरोगतज्ज्ञ सांगत असतात. वापरण्याला व बरोबर बाळगण्याला सोयीचे असल्याने या दिवसात पॅड वापरण्याकडे महिलांचा कल वाढत आहे. या दिवसात ग्रामीण भागातील मुली शाळेला दांडी मारतात. हे लक्षात आल्याने सरकारही त्यांना मोफत पॅड पुरवते. तथापि अशा सोयीसुविधा वापरताना त्याचा आरोग्याशी असलेला संबंध आणि त्यामुळे कळत-नकळत होणार्‍या प्रदूषणाविषयी किती महिलांना माहित असते? सामान्यतः दर आठ तासांनी पॅड बदला आणि प्रत्येकवेळी हात स्वच्छ धुवा, असे तज्ज्ञ आवर्जून सांगतात.

अलीकडे कापडी पॅड वापरण्याचा सल्लाही दिला जाताना आढळतो. त्यामागचे शास्त्र महिलांनी समजावून घेण्याची गरज आहे. सॅनिटरी पॅडमुळे होणारे प्रदूषण हा जागतिक चिंतेचा विषय आहे. पॅड कुठेही कसेही फेकून दिले जातात. कागदात गुंडाळून फेकण्याची तसदी देखील घेतली जाताना फारशी आढळत नाही. मातीत टाकले गेलेले एक पॅड नष्ट व्हायला सुमारे 500 वर्षे लागतात असे सांगितले जाते. कारण ते तयार करण्यासाठी वापरले जाणारे प्लास्टिक आणि करावी लागणारी रासायनिक प्रक्रिया. ते जाळले तरीही प्रदूषणच वाढते.

शिवाय तसेच फेकले गेलेले पॅड कचरा संकलित करणार्‍यांच्या आरोग्यावरही परिणाम करू शकते. याला पर्याय म्हणून कापडी पॅड किंवा सिलिकॉन कप वापरण्याचा सल्ला दिला जाताना आढळतो. त्याच्या शास्त्रोक्त वापराविषयी डॉक्टरांकडून माहिती घेतली जाऊ शकेल. मासिक पाळीचे चक्र प्रजनन क्षमतेशी संबंधित आहे. एकूणच मासिक पाळीच्या दिवसात आरोग्य आणि स्वच्छता राखणे अत्यावश्यक आहे. त्याविषयीच्या जाणिवा जितक्या वेगाने वाढतील तितक्या महिला आणि मुली या विषयावर निःसंकोच व्यक्त होऊ लागतील हे नक्की.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या