समाजात बदल घडावेत, अनेक कालबाह्य गोष्टींचा समाजाने त्याग करावा, नवीन मार्गांचा अवलंब करावा, अशी अपेक्षा बाळगणार्यांची संख्या मोठी आहे. अर्थात त्यासाठी एक पाऊल पुढे टाकण्याची आवश्यकता असते. किंबहुना बदलाची सुरुवात दुसर्या कोणीतरी करावी यावर सर्वांचीच सहमती असते. काहीजण मात्र बदलाची सुरुवात स्वतःपासून करतात. तसे करण्याची हिंमत दाखवतात. एका व्यक्तीने सुरुवात केली तरी कालांतराने लोक त्या बदलाचा स्वीकार करतात, त्या बदलाला जोडले जातात, याचे अनेक दाखले इतिहासात सापडू शकतील. ते सांगणारी दोन उदाहरणे नुकतीच उजेडात आली आहेत.
हुंडा पद्धतीवर कायद्याने बंदी आहे. तरीही छुप्या पद्धतीने अनेक घरांत ही प्रथा पाळली जात असल्याचे आढळून येते. हरियाणाच्या भिवानी गावातील एका वराने मात्र वधूपक्षाकडून त्याला देऊ केली गेलेली हुंड्याची लाखोंची रक्कम नाकारली. त्याने फक्त एक नारळ स्वीकारून विवाहविधी पार पाडला. हुंडा प्रथेला आपला विरोधच होता, असे त्याने सांगितले. दुसरी घटना उत्तर प्रदेशातील गाझियाबादच्या रइसपूर गावातील! विवाहात दोन कुटुंबांदरम्यान अकरा हजार रोपांची देवाण-घेवाण झाली. विवाह साधेपणे पार पडला. इतकेच नव्हे तर विवाहानिमित्त समाजोपयोगी उपक्रम म्हणून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. ही दोन्ही उदाहरणे समाजासाठी प्रेरणादायी ठरू शकतील.
हुंडा प्रथा अनेक महिलांसाठी भयप्रद व जीवघेणी ठरते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या कालखंडातसुद्धा काही दुर्दैवी महिला स्वतःचा जीव गमावतात. अनेकींना आयुष्यभर त्रास सहन करावा लागतो. पालकांना मुलगी ‘नकोशी’ होण्यामागे हुंडा आणि हौशीच्या नावाखाली खर्चिक बनलेली लग्ने हेही एक प्रमुख कारण मानले जाते. त्याचे भीषण दुष्परिणाम समाजाला सहन करावे लागतात. मुलगी झाली तर तिच्या विवाहात पालकांना प्रसंगी कर्ज काढावे लागते. त्यामुळे मुलगी नको, तिची काळजी नको आणि कर्जाचा बोजाही नको, असेच असंख्य पालकांना वाटू शकते.
हुंड्याच्या कूप्रथेला निदान दोन तरुण आणि त्यांच्या कुटुंबियांनी तरी जाहीर फाटा दिला आहे. अशा नवप्रथांना समाजानेदेखील बळ दिले पाहिजे. त्यांच्या घरातील विवाहसुद्धा याच पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न करता येईल. समाजात अशा अनेक कूप्रथा आढळतात. पुढे जाऊन त्या माणसाचे जगणे मुश्किल करू शकतात. त्या संपुष्टात आणण्यासाठी हुंडा नाकारण्यासारखे कौतुकास्पद पाऊल उचलणार्या व्यक्तींची संख्या वाढायला हवी. ‘मैं अकेलाही चला था, पर लोग साथ आते गये और धीरे-धीरे कारवाँ बनता गया’ असा अनुभव यावा. तसा प्रत्यय येण्यासाठी समाजाने जबाबदारी उचलली पाहिजे.