देशाने करून दाखवले अशीच भावना प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात आहे. पहलगाममध्ये झालेल्या आतंकवादी घटनेनंतर सामान्य माणसांच्या मनात प्रचंड संताप होता, अजूनही आहे. तो या ना त्या रूपाने समाज माध्यमांवर व्यक्त होत होता. देशाने कडक प्रत्युत्तर द्यावे अशीच त्यामागची भावना होती. देश चालवताना सत्तेच्या कारभार्यांना देशाच्या संरक्षणाबरोबरच जागतिक परिघाचाही विचार करावा लागतो. ती नेतृत्वाची कसोटीच मानली जाते. देश, नेतृत्व आणि तीनही सैन्यदले प्रत्येक कसोटीला खरे उतरले.
देशाने लोकभावनेचा आदर केला. आतंकवादाला आणि त्याला पोसणार्या देशाला कडक उत्तर दिले. त्यासाठी जगातिक स्तरावर बहुसंख्य देशांचे समर्थनही मिळवले. सर्व पातळ्यांवरच्या मुत्सद्देगिरीतील प्रवीणता पुन्हा एकदा जगाच्या लक्षात आणून दिली. फक्त दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. नागरिकांवर हल्ले केले नाहीत. हे ऑपरेशन पार पडत असताना सगळीकडे मॉकड्रिलचीच चर्चा शिगेला पोहोचली होती. सर्वांचे लक्ष तिकडे वेधले गेले होते. त्याचवेळी उपरोक्त ऑपरेशन घडवून आणले. मॉकड्रिलमधून लोकशिक्षण घडले असेल तरी तो मुत्सद्देगिरीचा एक भाग असू शकेल का? या मोहिमेतून दहशतवादाकडे बघण्याचा देशाचा दृष्टिकोन जगाच्या आणि दहशतवाद्यांच्या ठळकपणे लक्षात आला. काळाबरोबर देश बदलत असला तरी सर्वधर्मसमभावासारखी अनेक मूल्ये मात्र तीच आहेत, याची अनुभूती देशवासियांबरोबरच जगालाही दिली. ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती माध्यमांना कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी दिली.
आतंकवाद्यांनी धर्माचा वापर फूट पाडण्यासाठी व द्वेष पसरवण्यासाठी केला असला तरी भारत मात्र तसा विचार कधीच करत नाही हेच यातून अधोरेखित होते. पर्यटन हा काश्मीरच्या अर्थकारणाचा आत्मा आहे. गेली दहा वर्षे काश्मीरचे पर्यटन खर्या अर्थाने बहरत होते. जे काश्मिरी नागरिकांना स्थैर्य बहाल करणारे आणि शांतता जोपासणारे ठरत होते. म्हणूनच पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांना ते नको होते. धर्माच्या नावाखाली काश्मीरच्या स्थैर्याला नख लावण्याचा अश्लाघ्य प्रयत्न त्यांनी केला. त्याला देशाने चोख उत्तर दिले.
पहलगाम घटनेत महिलांनी त्यांचे सौभाग्य गमावले होते. भारतीय संस्कृतीत महिलांसाठी त्याचे स्थान प्राणप्रिय असते हे वेगळे सांगायला नको. देशनेतृत्वालाही त्याचे पूर्ण भान होते हे या ऑपरेशनच्या ‘सिंदूर’ या नावातूनच कळते. दहशतवाद्यांचा गळा घोटून ‘सिंदूर’चा सन्मान राखला ही भावना व्यक्त करताना त्या प्रत्येक महिलेचे डोळे नक्कीच ओले झाले असणार. देशाचे सैन्यदल राफेल, ब्राह्मोस यांसारख्या अत्याधुनिक तंत्रसामुग्रीने सज्ज आहे. देश म्हणून त्याची आवश्यकता सिद्ध झाली.
सैन्याच्या कर्तबगारीला मानवंदना.