Sunday, November 24, 2024
Homeअग्रलेखसंपादकीय : ९ ऑक्टोबर २०२४ - लेकी ‘नकोशा’?

संपादकीय : ९ ऑक्टोबर २०२४ – लेकी ‘नकोशा’?

शारदीय नवरात्रोत्सव नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. देवीमंदिरात भाविकांची दर्शनासाठी झुंबड उडत आहे. आदिशक्तीचा अहोरात्र जागर सुरू आहे. सर्वत्र आनंद, चैतन्य आणि मांगल्याने वातावरण भरून गेले आहे. ‘आधी आबादी’ म्हटल्या जाणार्‍या स्त्री-वर्गाला भारतीय समाजात आदिशक्तीचे रूप मानले जाते. सन्मानाने पूजले जाते. नाशिक महानगराला पौराणिक आणि ऐतिहासिक परंपरा लाभली आहे.

आदिशक्तीच्या साडेतीन पीठांपैकी अर्धेपीठ म्हणून ओळखले जाणारे देवी सप्तशृंगीचे वास्तव्य नाशिकपासून जवळच असलेल्या सप्तशृंगगडावर आहे. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांच्या वास्तव्याने नाशिकची भूमी पुनीत झालेली आहे. थोर महापुरुष, साहित्यिक आणि विचारवंतांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जोपासणारे शहर म्हणूनही नाशिकचा लौकिक आहे. येथील आल्हाददायक वातावरणात राहण्याचा मोह येथे येणार्‍या अभ्यागतांना आवरत नाही. अशा सर्वांग समृद्ध महानगरातील जन्मदराबाबतचा ताजा अहवाल नुकताच नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागाने जाहीर केला. त्या अहवालाने महानगरातील मुलींच्या घटत्या जन्मदराचे वास्तव उजेडात आणले आहे.

- Advertisement -

गेल्या आठ महिन्यांतील महानगरातील बाल जन्मदराची पडताळणी केली असता मुलींचा जन्मदर घसरल्याचे दिसून आले. एक हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण 898 पर्यंत खाली आले आहे. ऑगस्ट महिन्यात मुलींचा जन्मदर 868 इतका न्यूनतम पातळीवर पोहोचला होता. मागील सहा वर्षांतील मुलींच्या जन्मदराची आकडेवारी पाहता 2019 सालात तो 920 इतक्या दिलासादायक पातळीवर होता. त्यानंतर त्यात घट होत गेली. 2022 मध्ये हा दर 885 वर होता. 2023 मध्ये तो 915 वर पोहोचला. आता तो पुन्हा घसरला आहे. ‘स्मार्ट सिटी’ म्हणवणार्‍या नाशिकसाठी आणि नाशिककरांसाठी हे चित्र शोभादायक नाही.

नाशिकमध्ये लेकी ‘नकोशा’ झाल्या आहेत का? मुलींच्या जन्माचे स्वागत आणि आनंद सोहळे साजरे केले जात असल्याच्या तुरळक घटना महाराष्ट्रात पाहावयास मिळतात, पण नावापुढे ‘पुरोगामी’ विशेषण लागले म्हणून राज्यातील पुरुषप्रधान मानसिकता बदललेली नाही. एखाद्या कुटुंबात लागोपाठ दोन मुली जन्माला आल्यावर कुटुंबकल्याण शस्त्रक्रियेचा अवलंब करण्याऐवजी मुलाची आस ठेवून आणखी संधी घेतली जाते. ही मानसिकता अशिक्षितांमध्येच नव्हे तर तथाकथित सुशिक्षितांमध्येसुद्धा आढळते. अशा आशाळभूतांच्या अपेक्षापूर्तीसाठी छुप्या पद्धतीने सेवा देणारी बेकायदा गर्भपात केंद्रे चालवली जातात.

स्त्रीभ्रूण हत्याविरोधी कायदा अस्तित्वात असला तरी तो धाब्यावर बसवून कोवळ्या कळ्या जन्माला येण्याआधीच खुडण्याची दुकाने अजूनही सुरूच आहेत; ती कोणाच्या आशीर्वादाने? नाशिकमध्येही अशी बेकायदा गर्भपात केंद्रे चालू असावीत. गेल्याच महिन्यात महात्मानगरसारख्या उच्चभ्रू लोकवस्तीत असे बेकायदा केंद्र उघडकीस आले. बेकायदा गर्भपातप्रकरणी गेल्या दोन वर्षांत दोन रुग्णालयांवर कारवाई करण्यात आली. नाशिक शहर परिसरात 322 सोनोग्राफी केंद्रे कार्यरत असल्याची महापालिका दप्तरी नोंद आहे.

वैद्यकीय अधिकार्‍यांकडून त्या केंद्रांची तिमाही तपासणी केली जाते, असे मनपाकडून सांगितले जाते. सोनोग्राफी केंद्रांची वरचेवर तपासणी केली जात असेल आणि दोषींविरुद्ध कारवाया केल्या जात असतील तर मग मुलींचा जन्मदर का घसरत आहे? मुलांच्या जन्मदराच्या जवळपास तो का पोहोचू शकत नाही? ‘पकडला तो चोर आणि पकडला गेला नाही तो साव’ अशी याबाबत परिस्थिती असावी. महापालिका क्षेत्रातील मुला-मुलींच्या जन्मदरातील वाढती तफावत आणि मुलींचा घसरता जन्मदर सामाजिक चिंता वाढवणारे आहेत.

मुलींच्या जन्मदरातील घसरण एकट्या नाशिकपुरती मर्यादित आहे, असे समजण्याचे कारण नाही. राज्यातील अन्य शहरांतही त्याबाबत पडताळणी करण्याची आवश्यकता आहे. स्थानिक प्रशासनाप्रमाणेच राज्य सरकारी आरोग्य यंत्रणेनेही याबाबत वेळीच सजग झाले पाहिजे, असेच नाशिक महापालिकेचा अहवाल सूचित करतो. आजचा समाज शिक्षण आणि विचारांच्या प्रवाहासोबत पुढे जात आहे, जुन्या आणि अनिष्ट विचारांना तिलांजली देऊन पुरोगामी विचारांचा पुरस्कार करीत आहे, असे म्हटले जाते. मात्र, हा एकतर समज असावा किंवा भ्रम तरी असावा, असे म्हणण्यासारखी परिस्थिती आजकाल पाहावयास मिळते.

महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण कमी झालेले नाही. घरातच नव्हे तर बाहेरसुद्धा महिला सुरक्षित नसल्याचे हल्ली घडणार्‍या घटनांवरून स्पष्ट होते. अजाण बालिकादेखील अत्याचार्‍यांचे लक्ष्य ठरत आहेत. उमलण्याआधीच गर्भात खुडल्या जाणार्‍या कोवळ्या कळ्यांचे जीव वाचवणे असो किंवा महिलांवरील अत्याचारांचे भीषण संकट थांबवणे; फक्त कायद्याच्या धाकाने ते होणार नाही. सुजाण, सुसंस्कृत आणि जागरूक समाजाचीसुद्धा ती नैतिक आणि मुख्य जबाबदारी आहे हे विसरता येणार नाही.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या