Thursday, May 1, 2025
Homeअग्रलेखसंपादकीय : १ मे २०२५ - हा सामाजिक गुन्हाच!

संपादकीय : १ मे २०२५ – हा सामाजिक गुन्हाच!

भुकेले राहणाऱ्या लोकांची वाढती संख्या आणि दुसऱ्या बाजूला टनावारी अन्नाची नासाडी ही दोन टोके समाजात सातत्याने अनुभवास येतात. दिवस लग्नसराईचे आहेत. विवाहसोहळे, सार्वजनिक जेवणावळी, सामाजिक कार्यक्रम अशा विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्न वाया जाताना दिसून येते.

एकीकडे  दिवसाकाठी किमान एकवेळ उपाशी झोपणारे हजारो लोक आणि दुसरीकडे न खाल्ल्यामुळे होणारी अन्नाची नासाडी या एकाच नाण्याच्या दोन बाजू अस्वस्थ करणाऱ्या आहेत. २०२४ च्या जागतिक भूक निर्देशांकात भारताचे स्थान शंभराच्या खाली होते. माणसांच्या बेफिकिरीमुळे   फक्त अन्नच  वाया जाते का? ते बनवण्यासाठी इंधन, गोडे पाणी तसेच विविध प्रकारचे मसाले वापरले जातात.

- Advertisement -

मातीशिवाय पिके उगवतील का? मानवी तास उपयोगात आणले जातात. अन्न वाया घालवणे म्हणजे त्यांचीही नासाडीच नव्हे का? या गोष्टींचे पैशांत मूल्य मोजले जायला हवे. अन्नाबरोबर काय-काय वाया घालवले जाते याची जाणीव तरी माणसांना असेल का? पोटाला लागेल तेवढेच अन्न वाढून घ्यावे हे साधे सामान्यज्ञान  माणसांना का नसावे?

भारतीय संस्कृतीत अन्नाला पूर्णब्रह्म मानले जाते. तोच संस्कार लहान मुलांवर जाणीवपूर्वक केला जातो. शाळांमध्ये त्याच आशयाचे सुविचार फलक लावले जातात. त्या अर्थाच्या प्रार्थना आणि श्लोकही शिकवले जातात. मोठ्या वयात ही समज कुठे हरवते? अन्न कचऱ्यात फेकून देताना काहीच वाटत नसावे का? उरलेले अन्न बऱ्याचदा कचऱ्यात किंवा जमिनीवर फेकले जाते. ते तिथेच कुजते. त्यातून घातक वायू बाहेर पडतात. ते मानवी आरोग्यासाठी त्रासदायक ठरतात. माती आणि हवेचे एक प्रकारचे  प्रदूषणच  आहे.

या पार्श्वभूमीवर अन्न वाया घालवणे हा सामाजिक गुन्हा मानला जायला हवा. सार्वजनिक समारंभात उरलेले अन्न वाया जाऊ नये यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढाकार घेतात. भुकेले लोक आणि उरलेले अन्न यांच्यात दुवा सांधणारे उपक्रम राबवतात. तंत्रज्ञानाच्या मदतीने ऍप तयार करतात. यात वेगळे  प्रयोगही अनुभवास येतात. जिथे जेवलेले ताट ठेवले जाते, तिथे स्वयंसेवक उभे करतात. ताटात अन्न उरले असेल तर त्या व्यक्तीला ते खायला सांगितले जाते.

स्वच्छ केल्याशिवाय ताट ठेवू दिले जात नाही. अन्न आणि बरोबरीने नैसर्गिक संसाधने वाया जाऊ नयेत यासाठीच ही सगळी यातायात किंवा प्रयोग राबवले जातात. लोकांनी त्यामागील उद्देश लक्षात घेण्याची गरज आहे. अन्न वाया न घालवण्याचे सामाजिक भान प्रत्येकाने राखायलाच हवे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

पद्मश्री विखे पाटील कारखान्याच्या चौकशीला सामोरे जाण्याची तयारी – ना. विखे...

0
लोणी |वार्ताहर| Loni पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सादर झालेल्या चौकशी अहवालानंतर सदर प्रकरणात कोणताही फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल...