पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील दैत्यनांदूर गोळीबारामध्ये सरपंच संजय बाबासाहेब दहिफळे यांच्या हत्येतील मुख्य संशयीत आरोपी शहादेव पंढरीनाथ दहिफळे याला बुधवार (दि. 25) पोलीसांनी अटक केली आहे.
17 डिसेंबरला सायंकाळी तालुक्यातील दैत्यनांदूर येथे राजकीय वादातून झालेल्या गोळीबारात जखमी सरपंच संजय दहिफळे यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी शहादेव दहिफळे यांच्यासह 12 जणांवर पाथर्डी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हत्येतील मुख्य संशयीत आरोपी शहादेव दहिफळे हा अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार घेत होता. उपचार पुर्ण झाल्यानंतर पाथर्डी पोलीसांनी त्याला अटक केली आहे.
दरम्यान रुग्णालयात मुख्य संशयीत अरोपी शहादेव दहिफळे उपचार घेत असतांना त्यांनी दिलेल्या जबाबावरून मयत संजय दहिफळे यांच्या सह 11 जणांवर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला अशी फिर्याद दिली आहे. याप्रकरणात दोन्ही गटांकडून परस्परा विरोधा गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यात शहादेव दहिफळे, विष्णू दहिफळे, ज्ञानेश्वर दहिफळे, राहुल दहिफळे व व्दारका नागरगोजे या पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या हत्येचा तपास पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी करत आहेत.